Marathi News

डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानकडून नोबेलसाठी नामांकन, भारत-पाक युद्ध रोखल्याचं कारण, ट्रम्प म्हणाले..

Written by:Smita Gangurde
Published:
शस्त्रसंधीच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रात मध्यस्थता करण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतानं कोणतीही मध्यस्थता स्वीकारली जाणार नाही, हे स्पष्ट केलंय. मात्र पाकिस्ताननं ट्रम्प यांच्या या प्रयत्नाचं कौतुक केलंय.
डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानकडून नोबेलसाठी नामांकन, भारत-पाक युद्ध रोखल्याचं कारण, ट्रम्प म्हणाले..

इस्लामाबाद – पाकिस्तानी सरकारनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2026 सालासाठीच्या मोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दिलंय. भारत आणि पाकिस्तानातील युद्धाच्या काळात ट्रम्प यांनी कूटनीतीतून पुढाकार घेत मध्यस्थता केल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. ट्रम्प यांच्या पुढाकारामुळं एक मोओठं युद्ध आणि विनाश टळण्यास मदत झाली असा दावाही पाकिस्तानकडून करण्यात आलाय.

पाकिस्तानी सरकारनं त्यांच्या अधिकृत पत्रकात याचं कारण विषद केलं आहे. ट्रम्प यांनी नवी दिल्ली आणि इस्लामाबादेत दोन्ही बाजूंशी चर्चा करुन शस्त्रसंधीत मोलाची भूमिका बाजवली, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. दोन अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांतील युद्ध ट्रम्प यांच्यामुळं रोखलं गेल्याचं पाकिस्तानचं म्हणणंय.

काश्मीरमध्ये मध्यस्थतेच्या इच्छेचंही कौतुक

शस्त्रसंधीच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रात मध्यस्थता करण्याची इच्छा व्यक्त केली होती. भारतानं कोणतीही मध्यस्थता स्वीकारली जाणार नाही, हे स्पष्ट केलंय. मात्र पाकिस्ताननं ट्रम्प यांच्या या प्रयत्नाचं कौतुक केलंय. जोपर्यंत काश्मीरचा प्रश्नी निकाली लागत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानात स्थायी स्वरुपात शांतता निर्माण होणार नाही, असं पाकिस्तानचं म्हणणंय.

काहीही केलं तरी नोबेल मिळणार नाही-ट्रम्प

पाकिस्ताननं दिलेल्या नामांकनाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. कितीही युद्धसंहार थांबवला किंवा काहीही केलं तरी मला नोबेल मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिलीय.

भारत-पाकिस्तान, रशिया-युक्रेन, इराण-इस्र्याल यासारख्या वादांना सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलाय. मात्र तरीही शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार नाही, असंही ट्रम्प यांनी म्हटलय.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, मी काहीही केलं तरी मला नोबेल शांती पुरस्कार मिळणार नाही. परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या साथीनं कांगो-रवांडा युद्ध थांबवण्यासाठी शांतीकरार केला. हा गेल्या काही दशकांपासून सुरु असलेला खुनी संघर्ष होता.

पाक लष्कर प्रमुख आणि ट्रम्प यांच्यात चर्चा

बुधवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची बंद दाराआड भेट घेतली होती. दोघांनीही व्हाईट हाऊसमध्ये एकत्र लंच केले होते. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची इतकी खातीरदारी केली. मुनीर यांनी ट्रम्प यांना शांततेचं नोबेल द्यावं या केलेल्या मागणीनंतर या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. मुनीर यांची ट्रम्प यांच्याशी बातचीत होण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि ट्र्म्प यांच्यात सुमारे 35 मिनिटे फोनवर चर्चा झाली होती.

Follow Us :GoogleNews