लॉस एंजिलिसमध्ये आगडोंब आणि हिंसाचार; मास्क घालणाऱ्यांची धरपकड, ट्रम्प म्हणाले…

Written by:Smita Gangurde
Published:
लॉस एंजिलिस शहरावर बेकायदा प्रवाशांनी कब्जा केला असून, यातून लवकरच शहर स्वतंत्र होईल, असं ट्रम्प म्हणाले आहेत.
लॉस एंजिलिसमध्ये आगडोंब आणि हिंसाचार; मास्क घालणाऱ्यांची धरपकड, ट्रम्प म्हणाले…

लॉस एंजिलिस- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजिलिसमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढण्याच्या अमेरिकी सरकारच्या धोरणाविरोधात गेल्या 3 दिवसांपासून हिंसक आंदोलन सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

संतप्त आंदोलनकर्त्यांनी शेकडो गाड्या जाळून टाकल्या आहेत. आंदोलनकर्ते हे अमेरिकेच्या राष्ट्रध्वजावर थुंकून त्याचा अपमान करताना दिसतायेत. या आंदोलनात जे मास्क घालून हिंसा करत आहेत त्यांना तातडीनं अटक करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

शहरावर बेकायदेशीर प्रवाशांचा कब्जा-ट्रम्प

लॉस एंजिलिस शहरावर बेकायदा प्रवाशांनी कब्जा केला असून, यातून लवकरच शहर स्वतंत्र होईल, असं ट्रम्प म्हणाले आहेत. सुरक्षा कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी मास्क घालून आंदोलनकर्ते हिंसाचार करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केलाय.

हिंसाचार आणि तोडफोडीनंतर शहरात तैनात करण्याता आलेल्या नॅशनल गार्डच्या जवानांचं कौतुकही ट्रम्प यांनी केलंय. या जवानांची नियुक्ती त्या त्या राज्यातील गव्हर्नरांमार्फत करण्यात येते, यावेळी ट्रम्प यांच्या आदेशानं ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर यांचा मात्र या तैनातीला विरोध आहे. ट्रम्प यांच्याविरोधात राज्य सरकार कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराला लागली गोळी

या विरोधी आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन पत्रकार लॉरेन टोमासी याच्यावर पोलिसांनी रबर बुलेट डागली. ही गोळी या पत्रकाराच्या पायात लागली आहे. आंदोलनकर्त्यांना शहराच्या मध्यवर्ती भागातून हटवण्यासाठी घोड्यावर आलेले नॅशनल गार्ड रबर बुलेटनं गोळीबार करत असताना हा प्रकार घडला.

दरदिवशी तीन हजार बेकायदा प्रवाशांना अटक करण्याचा प्रयत्न

ट्रम्प यांच्या डिपोर्टेशन धोरणांतर्गत, दरदिशी तीन हजार बेकायदा प्रवाशांना अटक करुन त्यांना डिपोर्ट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. काही व्यापाऱ्यांनी बनावट कागदपत्रांचा केलेला वापर हेही छापेमारीचं एक कारण असल्याचं मानण्यात येतंय. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दररोज 1600 बेकायदेशीर प्रवाशांना पकडण्यात येतंय. ट्रम्प यांच्याया धोरणामुळं अमेरिकेत अशांतता निर्माण होताना दिसतेय.