आजची सकाळ दिल्लीकरांना हादरवणारी ठरली. राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ९:०४ वाजता अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे धक्के जाणवल्यानंतर लोक हाततील कामे सोडून सैरावैरा पळताना दिसले.
भूकंपाचे धक्के; नागरिक भयभीत
दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये सुमारे 10 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते. यामुळे घरे आणि इमारतींमधील सामानांची पडझट झाल्याने काही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घरे आणि इमारतींमधून बाहेर पळाले. भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली एनसीआर सोबतच, उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आणि हरियाणातील जींद आणि बहादूरगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. सकाळी कार्यालयात पोहोचलेल्या लोकांना देखील भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
हे ही वाचा
दिल्ली भूकंप संवेदनशील क्षेत्र
भूकंपाच्या बाबतीत दिल्ली संवेदनशील क्षेत्रात आहे. दिल्ली भारतीय उपखंडातील त्या भूगर्भीय प्रदेशात येते जिथे दोन टेक्टोनिक प्लेट्स (भारतीय आणि युरेशियन प्लेट्स) एकमेकांवर आदळतात. यामुळे उत्तर भारतात विशेषतः हिमालयीन प्रदेशात भूकंपाच्या हालचाली अधिक असतात. याचा परिणाम दिल्लीवरही परिणाम होतो. भूकंपाच्या जोखमीच्या बाबतीत दिल्ली उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्र झोन-4 मध्ये गणले जाते.
या प्रदेशात भूकंपांची तीव्रता मध्यम ते तीव्र असू शकते. अलिकडच्या काळात दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात अनेक वेळा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. दिल्लीतील लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे आणि अनेक इमारती भूकंप-प्रतिरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत मोठा भूकंप झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकार आणि नागरिकांनी सतर्क राहणे, भूकंप सुरक्षा नियमांचे पालन करणे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार राहणे आवश्यक आहे.