Marathi News

कुलगामच्या गुड्डार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू

Written by:Rohit Shinde
Published:
नुकतीच कुलगाममधील गुड्डार भागात सैन्यदलाकडून एक कारवाई करण्यात आली. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
कुलगामच्या गुड्डार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू

गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मिरातील दहशतवाद्यांच्या हालचालींना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन ऑल आउट’ सारख्या मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमेमध्ये दहशतवाद्यांना ओळखून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येते. नुकतीच कुलगाममधील गुड्डार भागात सैन्यदलाकडून एक कारवाई करण्यात आली. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी चकमक

जम्मू-कश्मीरच्या कुलगाममधील गुड्डार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवादी ठार झाला तर एक जवानही जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, परिसरात अजून 2-3 दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षाबलावर गोळीबार सुरू केला, ज्यामुळे गोळीबार अधिक तीव्र झाला. भारतीय सेनेच्या चिनार कोरने X प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, सतर्क असलेल्या सैनिकांनी संशयास्पद हालचाली लक्षात घेतल्या आणि आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला तर एक ज्युनियर कमिशंड ऑफिसर (JCO) जखमी झाला आहे.

परिसरात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू

सुरक्षा दलाने गुडार वन परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्याने शोधमोहीमेचे जोरदार चकमकीत रुपांतर झाले. स्वतःला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर प्रतिसादात सुरक्षा दलानेही गोळीबार केला. सुरक्षा दलाने परिसराला पूर्णपणे वेढा दिला असून अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे जेणेकरून दहशतवाद्यांना पलायन करण्याची संधी मिळू नये.

कुलगाम, पुलवामा, सोपोर, शोपियां, बारामुला अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अशा चकमकी वारंवार घडताना दिसतात. स्थानिक लोकांच्या मदतीने दहशतवाद्यांना आसरा मिळतो, परंतु अनेक नागरिक अशा हिंसाचारामुळे त्रस्त आहेत. सैन्य दल सतत गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवतात आणि जंगल, डोंगराळ भाग, गावं-खेड्यांमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेतात.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews