मुलीला कर्करोग झाला तर संपूर्ण शाळेने केलं मुंडन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Written by:Smita Gangurde
Published:
राजस्थानमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा मुंडण केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मुलीला कर्करोग झाला तर संपूर्ण शाळेने केलं मुंडन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

राजस्थानमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा मुंडण केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या लहानग्यांनी मुंडण का केलं, याचं कारण ऐकलं तर तुम्ही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या शाळकरी मुलांचा मुंडण केलेल्या अवस्थेत शाळेत जात असतानाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ राजस्थान जिल्ह्यातील जोधपूर तालुक्यातील एका गावाचा आहे. एका शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनीही आपलं मुंडण केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय. मात्र हे करण्यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा किंवा नवी फॅशन जन्माला घालण्याचा त्यांचा उद्देश नाही.

शाळेतल्या विद्यार्थी, शिक्षकांनी का केलं मुंडण?

या शाळेतील एक विद्यार्थिनी कर्करोगाशी झुंज देत आहे. उपचारादरम्यान किमो थेरपीमुळे तिचे केस गळालेत. यामुळे तिला शाळेत वेगळं वाटलं. केस गळाल्यानं लहानगीची मानसिकदृष्ट्या खचली आहे. केस गळाल्यानं आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना निर्माण झाली. विद्यार्थिनीला एकटेपणा वाटू नये यासाठी शाळेने पुढाकार घेतला आणि शाळेतल्या सगळ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनीही मुंडण केलं. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत शाळेतल्या शिक्षकांनीही टक्कल करण्याचा निर्णय घेतला.

संवेदनशील उपक्रमाचं होतंय कौतुक

शाळेतील कर्करोगाशी झुंज देणाऱ्या विद्यार्थिनीचं मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी हा अनोखा आणि संवेदनशील उपक्रम राबवलाय. एका कर्करोगाशी झुंज देणाऱ्या विद्यार्थिनीला नैराश्य वाटू नये, यासाठी घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद असाच म्हणावा लागले. या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचंही आता सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. सामाजिक संवेदनशीलतेचे आणि सहानुभूतीचे हेच धडे या विद्यार्थ्यांना आयुष्यात खूप मोठं करतील.

समाजासाठी एक चांगला संदेश

व्हायरल होणारा व्हिडिओ राजस्थानचा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या शाळेतील आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र या व्हिडिओतून एक सकारात्मक संदेश दिला जात आहे. हा व्हिडिओ दाखवतो की, जेव्हा एखादं मूल आजाराशी झुंज देत असतो तेव्हा त्याच्या सभोवतालच्या लोकांचा आधार आणि प्रेम त्याची सर्वात मोठी ताकद बनू शकते. जोधपूरमधील या घटनेतून हे दिसून येतं की, छोटेसे बदल देखील एखाद्याच्या आयुष्यात मोठी आशा आणू शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ केवळ व्हायरल झाला नाही तर लोकांच्या हृदयालाही स्पर्शून गेला.

Follow Us :GoogleNews