उत्तर भारतातील उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, मध्य-प्रदेश या राज्यांमध्ये आता मान्सूनच्या पावसाने जोर पकडायला सुरूवात केली आहे. मान्सूनचा पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत प्रयागराजमधून बातमी समोर येत आहे. प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण प्रयागराज जिल्ह्यात पुराची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे एक मीटरपेक्षा अधिक पातळीवर नद्या वाहत असून 10 हजारांहून अधिक घरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. सदर, करछना, फूलपूर, सोरांव, हंडिया आणि बारा या तालुक्यांतील गावे थेट पुराच्या तडाख्यात आली आहेत.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले!

पाण्याखाली गेलेल्या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस व प्रशासनाचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.अनेक नागरिक स्वतःच सुरक्षित भागात किंवा नातेवाईकांकडे स्थलांतर करत असल्याचे दिसून येत आहे.फाफामऊ आणि छतनाग येथे गंगा नदीची पातळी 85.77 मीटर आणि 85.05 मीटर नोंदवली गेली आहे, तर नैनी येथे यमुनेची पातळी 85.78 मीटर इतकी झाली आहे. नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी, औषधे, आदी सुविधा पुरविण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. वाराणसीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याने गंगा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर पूरग्रस्त भागाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याचबरोबर आसपासच्या परिसरातही पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी परिस्थिती आणखी बिकट झाली. अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

त्तर भारतात पावसाचा जोर वाढणार!

दिल्ली, उत्तर प्रदेश भागांमध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. राज्यात रविवारी देखील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाल्याचे बघायला मिळाले. देशाची राजधानी दिल्ली आणि त्याच्या लगतच्या एनसीआर भागात पाऊस सुरूच आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात 5 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस सुरूच आहे. वाराणसी, प्रयागराज, बांदा, हमीरपूर, झाशीसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. 5 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.