प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आलेला लाँग विक एंड साधत देशभरातील पर्यटक हे सध्या जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत. मात्र याच काळात जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होतेय. रस्तेही या बर्फवृष्टीमुळे बंद पडलेत, काही ठिकाणी पर्यटकांची गैरसोयही होतेय मात्र तरीही पर्यटकांचा उत्साह मात्र तितकाच कायम आहे.
हिमाचलात बर्फवृष्टी
देशातील डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. उत्तर भारतासह दक्षिणेतही यामुळे थंडीत वाढ झालीय. हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यातील ६८० पेक्षा जास्त रस्ते बंद झालेत. मनालीजवळ सुमारे १००० गाड्या बर्फात अडकलेल्या आहेत.
जम्मू काश्मिरातही बर्फवृष्टी
जम्मू काश्मीरमध्येही जोरदार बर्फ पडतोय. मात्र तरीही श्रीनगर विमानतळावरुन विमानांची उड्डाणं सुरुच आहे. गुलमर्गसारख्या ठिकाणी तापमान मायनसमध्ये गेलेले आहे. काश्मिरात गेलेल्या पर्यटकांना बर्फवृष्टी आणि थंडीचा अनुभव घेता येतोय. जम्मू काश्मीरमध्येही अनेक रस्ते गेल्या दोन तीन दिवसांपासून बंद आहेत. सैन्यदल आणि प्रशासनाकडून बचावकार्य करण्यात येतंय.
उत्तराखंडात हिमस्खलनाचा अलर्ट
उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे काही भागात हिमस्खलन होईल असा इशारा देण्यात आलाय. संरक्षण विभागाच्या वतीनं हा अलर्ट देण्यात आला असून बचावकार्याच्या उपाययोजनाही सुरु करण्यात आल्यात. राजसाथानतही जोरदार थंडी पाहायला मिळतेय. माऊंट टाबूमध्ये तापमान ०.६ अंशांवर पोहचलंय.





