पुन्हा एकदा हिंदी-चीनी ‘भाई-भाई’ चा नारा? पंतप्रधान मोदी-शी जिनपिंग भेटीत ट्रम्प यांना इशारा?

Written by:Smita Gangurde
Published:
अमेरिकेने जगात सुरू केलेलं व्यापार युद्ध, भारत- पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला, यूक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्ध या विषयांवर प्रामुख्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुन्हा एकदा हिंदी-चीनी ‘भाई-भाई’ चा नारा? पंतप्रधान मोदी-शी जिनपिंग भेटीत ट्रम्प यांना इशारा?

शांघाय– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी चीन दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांच्या बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थिती लावणार आहेत. अमेरिकेकडून भारतावर सुरू असलेली 50 टक्के टॅरीफची कुरघोडी आणि भारताला पुढे करून चीन, रशियाविरोधात रचलेलं षडयंत्र यावर भारतानं आता धोरणात्मक पावलं टाकत आपला पवित्रा स्पष्ट केलाय.

रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र घेतो, याचं कारण देत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दुप्पट टेरिफ आकारला आहे. यानंतर नुकतीच ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे पुतीन यांनी मोदींनी फोन करुन सांगितल्याची माहिती आहे. त्यातच मोदी यांचा चीन दौरा चर्चेचा विषय ठरतोय.

मोदी-जिनपिंगमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

अमेरिकेने जगात सुरू केलेलं व्यापार युद्ध, भारत- पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला, यूक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्ध या विषयांवर प्रामुख्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे.

अजित डोवाल आणि पुतीन यांच्यातही चर्चा

गेल्या आठवड्यात भारताचे सुरक्षा सल्लागाल अजित डोवाल यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. अमेरिकेकडून सुरू असलेल्या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठं महत्त्व आहे. दुसरीकडे चीनसोबत संबंध सुधारण्यासाठी भारतानं सुरुवात केलेय.

जून महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चीनला गेले होते. तर सध्या 3 दिवसांच्या भारत भेटीवर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. या भेटीगाठींमुळं मोदींचा चीन दौरा महत्त्वाचा ठरणाराय..

मोदींचा चीन दौरा का महत्त्वाचा?

पंतप्रधान मोदी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीनमध्ये एससीओ प्रमुखांच्या परिषदेसाठी ते उपस्थित राहतील. बैठकीत सदस्य राष्ट्रांमधील विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा होणार आहे. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारमंथन होणार. एससीओ क्षेत्रात अमेरिकेचा प्रभाव कमी करण्याबाबत चर्चा होणार

गलवान घाटीमधल्या संघर्षानंतर भारत-चीनमधील बिघडलेले संबंध पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर मोदींचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. एवढंच नाही तर दोन्ही देशातील व्यापारी संबंध सुधारण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत. दोन्ही देशात नथुला, शिपकी ला आणि लिपुलेखा या भागातून थेट व्यापार करण्याची संधी आहे.. मात्र गलवान संघर्षानंतर हा व्यापार पूर्ण पणे ठप्प आहे.. अनेक गोष्टींवर चीनकडून निर्बंध लादण्यात आले आहेत

चीनकडून व्यापारात खोडा

भारताला होणाऱ्या विशेष खतांची निर्यात चीननं थांबवली आहे. बुलेट ट्रेनच्या टनेल मशीनवर चीनकडून भारतावर आयातबंदी लादण्यात आली. रेअर अर्थ एलिमेंट्स अर्थात लिथिनियम, नियोडियम, प्रासियोडियम यासारख्या धातूंची भारतात होणारी निर्यात चीननं थांबवली हा थांबलेला व्यापार मोदींच्या दौऱ्यानंतर सुरू व्हावा ही अपेक्षा आहे. अजित डोभाल आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील चर्चेकडेही लक्ष आहे.

मोदी जिनपिंग भाई-भाईचा नारा

भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका चीन आणि रशियावर अंकुश ठेवू पाहतोय. मात्र टॅरिफ वॉरनंतर अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी भारतानं कंबर कसलेय. त्या पार्श्वभूमीवर मोदी-जिनपिंग भाई-भाई चा नारा पुन्हा दिला गेला तर आश्चर्य वाटायला नको.