Marathi News

हिंदी विरूद्ध प्रादेशिक भाषा धग दक्षिण भारतात पोहोचली; हिंदी शिकण्याचे पवन कल्याण यांचे आवाहन, प्रकाश राज संतापले!

Written by:Rohit Shinde
Published:
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण यांचे वक्तव्य आणि त्यावरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा भाषाविषयक संवेदनशीलतेचा मुद्दा समोर आणतो.
हिंदी विरूद्ध प्रादेशिक भाषा धग दक्षिण भारतात पोहोचली; हिंदी शिकण्याचे पवन कल्याण यांचे आवाहन, प्रकाश राज संतापले!

महाराष्ट्रात अलीकडेच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर झालेला गदारोळ सर्वांनी पाहिला. त्यानंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी दक्षिण भारतातील नागरिकांनी हिंदी भाषा शिकावी, असे आवाहन करत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला आहे. त्यामुळे अभिनेते प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांना चांगलेच धारेवर धरले. नेमका काय वाद निर्माण झालाय? ते सविस्तर जाणून घेऊ…

दक्षिणेतील लोकांनी हिंदी शिकावी -पवन कल्याण

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी दक्षिण भारतातील नागरिकांनी हिंदी भाषा शिकावी, असे आवाहन करत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला आहे. हिंदी ही देशाला एकत्र बांधणारी भाषा असून ती शिकल्याने कोणत्याही प्रादेशिक भाषेला धोका नाही, असे मत त्यांनी व्यक्त केल्यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

पवन कल्याण हैदराबाद येथे ‘दक्षिण संवाद’ या राजभाषा विभागाच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलत होते. “जर तेलुगू ही माझी माता आहे, तर हिंदी माझी मोठी माता आहे. ही भाषा आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर असून संपूर्ण देशाला जोडणारी आहे,” असे त्यांनी म्हटले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील वाढती संधी, प्रादेशिक चित्रपटांचे हिंदीतील डबिंग आणि त्यातून होणाऱ्या कमाईकडेही लक्ष वेधले.

पवन कल्याण यांच्यावर प्रकाश राज संतापले!

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या या वक्तव्यावरून प्रकाश राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पवन कल्याण यांना उद्देशून लिहिले, “फक्त विचारतोय, स्वतःला किती किंमतीत विकले? ही लज्जास्पद गोष्ट आहे.” प्रकाश राज यांनी यापूर्वीही हिंदी भाषेच्या प्रचाराबाबत पवन कल्याण यांच्यावर टीका केली होती. मे 2025 मध्ये तमिळनाडूतील नेत्यांनी हिंदीला विरोध केला असताना पवन कल्याण यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळीही प्रकाश राज यांनी भाषेच्या सक्तीविरोधात स्पष्ट मत मांडले होते. त्यामुळे हिंदी विरूद्ध प्रादेशिक भाषा हा वाद काही संपण्याचे नाव घेत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews