सध्या जगातील नऊ देशांकडे मिळून सुमारे 15 हजार अण्वस्त्रे असल्याचं मानलं जातं. ही संख्या इतकी मोठी आहे की पृथ्वीवरील मानवजातीचा अनेक वेळा नाश होऊ शकतो. अणुबॉम्बचा परिणाम केवळ स्फोटापुरता मर्यादित नसतो; त्यातून निर्माण होणारी प्रचंड उष्णता, धक्क्याची लाट आणि किरणोत्सर्ग काही सेकंदांतच भीषण विध्वंस घडवून आणतात. त्यामुळे अणुबॉम्ब फुटल्यावर नेमकं काय होतं आणि त्यातून निर्माण होणारी उष्णता किती धोकादायक असते, हा प्रश्न अनेकांना पडतो.
स्फोटानंतर तयार होतो अग्नीचा महागोळा
अणुबॉम्ब फुटताच काही सेकंदांत एक प्रचंड अग्नीचा गोळा (फायरबॉल) तयार होतो. याचं तापमान लाखो ते काही मिलियन अंश सेल्सियसपर्यंत पोहोचू शकतं. इतक्या भीषण उष्णतेमुळे स्फोटाच्या अगदी जवळ असलेली प्रत्येक वस्तू क्षणार्धात जळून खाक होते. वैज्ञानिकांच्या मते, या तापमानामुळे मानवी शरीरही वाफ होऊ शकतं.
स्फोटाच्या वेळी निर्माण होणारी तीव्र प्रकाशझोत विजेच्या कडकडाटापेक्षा अनेक पटींनी तेजस्वी असते. यामुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊन तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. त्यानंतर पसरणारी थर्मल रेडिएशन मोठ्या परिसरात आग लावते कपडे, झाडं, लाकूड आणि इमारती पेट घेतात आणि अनेकदा ‘फायरस्टॉर्म’ म्हणजेच आगीचं वादळ तयार होतं.
धक्क्याची लाट शहर उद्ध्वस्त करू शकते
उष्णता आणि प्रकाशानंतर सर्वात घातक ठरते ती शॉक वेव म्हणजे धक्क्याची लाट. ही लाट ताशी शेकडो किलोमीटर वेगाने पसरते. स्फोटाजवळील लोकांचा तत्काळ मृत्यू होऊ शकतो, तर दूर असलेल्या लोकांना फुफ्फुसांना इजा, कानाचे पडदे फाटणे आणि अंतर्गत रक्तस्राव यांसारख्या गंभीर दुखापती होऊ शकतात.
इमारती कोसळतात, उडणारा मलबा जीवघेणा ठरतो. अनेक वेळा भूमिगत बंकर किंवा शेल्टरदेखील पुरेसे ठरत नाहीत. आग आणि धुरामुळे ऑक्सिजन कमी होतो, तर कार्बन मोनॉक्साइडसारख्या विषारी वायूंमुळे गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सुरुवातीचा स्फोट टळला तरी नंतर जीव धोक्यात येऊ शकतो.
जागतिक पातळीवर होऊ शकतो परिणाम
अणुस्फोटानंतर पसरणारा आयनकारी किरणोत्सर्ग तात्काळ आणि दीर्घकालीन दोन्ही प्रकारचं नुकसान करतो. त्याच्या संपर्कात आलेले लोक गंभीर आजारांना बळी पडू शकतात किंवा मृत्यूही ओढवू शकतो. दीर्घकाळात कर्करोग आणि आनुवंशिक विकारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
रेडिओअॅक्टिव्ह फॉलआउटमुळे पर्यावरण दूषित होतं. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रांचा वापर झाल्यास त्याचा परिणाम केवळ एखाद्या शहरापुरता किंवा देशापुरता मर्यादित राहणार नाही; तर जागतिक हवामानातही मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे अण्वस्त्रांचा धोका हा संपूर्ण मानवजातीसमोर उभा असलेला गंभीर प्रश्न मानला जातो.





