Marathi News

150 वर्षांत बौद्ध असलेला देश झाला मुस्लीम, 2500 वर्षांचा काय इतिहास, काय झाली स्थिती?

Written by:Smita Gangurde
Published:
या देशाचा इतिहास 2500 वर्ष जुना आहे. 5 लाखांची लोकसंख्या असेलल्या मालदीवमधील 98 टक्के जनता ही मुस्लीम आहे. मात्र सुमारे 900 वर्षांपूर्वी या देशात बौद्ध आणि हिंदू हे दोन धर्म प्रमुख धर्म होते.
150 वर्षांत बौद्ध असलेला देश झाला मुस्लीम, 2500 वर्षांचा काय इतिहास, काय झाली स्थिती?

माले – दक्षिण आशियातील सर्वात लहान देश अशी मालदीव देशाची ओळख आहे. भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या हिंद महासागरात हा देश आहे. 1200 द्वीपांमध्ये पसरलेल्या या देशाचं क्षेत्रफळ आहे 298 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे दिल्लीच्याही पाचपट लहान असलेला भूभाग हे या देशाचं क्षेत्रफळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मालदीव देशाला शुक्रवारी भेट दिलीय.

या देशाचा इतिहास 2500 वर्ष जुना आहे. 5 लाखांची लोकसंख्या असेलल्या मालदीवमधील 98 टक्के जनता ही मुस्लीम आहे. मात्र सुमारे 900 वर्षांपूर्वी या देशात बौद्ध आणि हिंदू हे दोन धर्म प्रमुख धर्म होते. आता याच देशात मुस्लिमांची लोकसंख्या आश्चर्यकारकरित्या 98 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे.

150 वर्षांत देश कसा झाला मुस्लीम?

12 व्या शतकात या देशाच्या राजानं मुस्लीम धर्म स्विकारला होता. त्यानंतर अवघ्या 150 वर्षांत संपूर्ण देशच जवळपास मुस्लिमांचा देश झाला आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार बदललेल्या पर्यावरण स्थितीत येत्या 25 वर्षांत मालदीवचा 80 टक्के भाग हा समुद्रात बुडण्याची शक्यता आहे.

1000 वर्ष बोद्ध हा मालदीवचा प्रमुख धर्म

अडीच हजार वर्षांपूर्वी मालदीवमध्ये मानवी वस्तीला सुरुवात झाली. काही ऐतिहासिक दस्तावेजानुसार मालदीवमध्ये प्राचीन राजतंत्राची सुरुवात ही ओडिशाचा (कलिंगाचा) राजा ब्रह्मादित्यचा पुत्र, बौद्ध राजा श्री सुरुदासरुण आदित्य याने केली होती. त्यांच्याच कार्यकाळात बौद्ध धर्म मालदीवपर्यंत पोहचल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर सुमारे 1000 वर्ष बौद्ध हाच मालदीव देशाचा प्रमुख धर्म राहिल्याचं इतिहासकार सांगतात. याच काळात मालदीवची संस्कृती, भाषा आणि प्राचीन धिवेही लिपीचाही विकास या ठिकाणी झाला.

मालदीवच्या अनेक द्वीपांवर आझही बौद्ध मठ आणि वास्तूंचे अवशेष शिल्लक आहेत. स्थानिक भाषेत या वास्तूंना हवित्ता किंवा उस्तुबू असं संबोधलं जातं.

मालदीववर 6 इस्लामी राजवटींनी केलं राज्य

मालदीवमध्ये 9व्या आणि 10 शतकात अरब व्यापाऱ्यांच्या रुपानं मुस्लीम धर्माचा प्रवेश झाला. मालदीवचे अखेरचे बौद्ध राजे धोवेमी यांनी 1153 साली इस्लाम धर्माचा स्वीकार केला. उत्तर अफ्रिकेतील इस्लामी विद्वान अबु जल बरकात युसूफ अल बरबरी यांनी राजाला इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केलं. धोवेनी य़ांना नंतरच्या काळात सुल्तान सुल्तान मोहम्मद इब्न अब्दुल्लाह असं नाव देण्यात आलं. यासोबत मालदीवमध्ये मुस्लीम राजवटीला सुरुवात झाली. मालदीव देश बौद्ध धर्मातून मुस्लीम होण्यासाठी 150 वर्षांचा कालखंड जावा लागला.

ही इस्मामिक राजवट सहा वंश म्हणजे सुमारे 1968 पर्यंत या देशात सुरु होती. 2008 साली मालदीवच्या नव्या घटनेत इस्लाम हा अधिकृत धर्म घोषित करण्यात आला आणि नागरिकतेसाठी इस्लाम धर्म हा अनिवार्य करण्यात आला.

1965 साली इंग्रजांकडून मिळालं स्वातंत्र्य

मालदीववर वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केलं. 1558 साली पोर्तुगिज यांचं राज्य होतं, 15 वर्ष राजधानी मालेवर त्यांचं नियंत्रण त्या काळी होतं. 1573 साली पोर्तुगिजांच्या राजवटीतून देशाची मुक्तता झाली. 1887 साली ब्रिटिश सरकारसोबत मालदिवनं एक करार केला. यानुसार आंतरिक स्वातंत्र्य अबाधित राहिलं असलं तरी परराष्ट्र धोरण आणि संरक्षण यावर ब्रिटनचं नियंत्रण होतं. 26 जुलै 1965 साली देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. प्राचीन काळात श्रीलंकेच्या सिंहली राजवटीचा आणि दक्षिण भारतातील चोल साम्राज्याचा प्रभावही या बेटांवर होता.

 

Follow Us :GoogleNews