MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

India China Conflict: चीनचा भारताला धक्का; थेट WTO कडे तक्रार, नेमका विषय काय?

Written by:Rohit Shinde
Published:
भारत-चीन या दोन आशियाई महासत्तांमधील व्यापारी तणाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. चीनने थेट जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार केली आहे. नेमका विषय काय? ते जाणून घेऊ...
India China Conflict: चीनचा भारताला धक्का; थेट WTO कडे तक्रार, नेमका विषय काय?

भारत आणि चीनमधील सीमावर्ती भागांतील लष्करी संघर्ष आपल्यासाठी नवीन नाही. मात्र, भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमधील व्यापारी संघर्ष देखील सातत्याने जागतिक पातळीवर चर्चेत येत असतो. भारत-चीन सततचा व्यापार संघर्ष हा आर्थिक, राजकीय आणि धोरणात्मक कारणांमुळे वाढत आहे. सीमावाद, आयात-निर्यात असमतोल, तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रातील स्पर्धा यांचा या संघर्षावर मोठा प्रभाव आहे. चीनकडून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आयातीमुळे भारतीय उद्योगांवर दबाव वाढला आहे, तर भारताने आत्मनिर्भर धोरण, आयात निर्बंध आणि स्थानिक उत्पादनाला चालना देण्यावर भर दिला आहे. या संघर्षाचा परिणाम व्यापार, गुंतवणूक आणि दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवर होत आहे. आता आणखी एका मुद्द्यावर भारताची चीनने थेट जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार केली आहे.

चीनचा भारताच्या विरोधात पुन्हा कांगावा

भारत-चीन या दोन आशियाई महासत्तांमधील व्यापारी तणाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. चीनने भारताविरोधात पुन्हा एकदा जागतिक व्यापार संघटनाकडे धाव घेत तक्रार केली आहे. माहिती व संचार तंत्रज्ञान क्षेत्रातील आयात शुल्क आणि सौरऊर्जा क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या सब्सिडीवरून हा वाद उफाळून आला आहे. चीनने ही याचिका शुक्रवारी दाखल केली. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात भारताने स्वीकारलेली धोरणे WTOच्या अनेक तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः नॅशनल प्रिन्सिपल  या तत्त्वाचे उल्लंघन होत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. भारताची धोरणे आयात-प्रतिस्थापन सब्सिडीच्या श्रेणीत येतात, जी WTOच्या नियमांनुसार थेट प्रतिबंधित आहे, असा दावा चीनने केला आहे.

चीनच्या म्हणण्यानुसार, भारताच्या सध्याच्या धोरणांमुळे देशांतर्गत उद्योगांना अनुचित स्पर्धात्मक फायदा मिळतो आणि त्यामुळे विदेशी, विशेषतः चिनी कंपन्यांसाठी बाजार असमान बनतो. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तत्त्वांना धक्का बसत असून, चिनी कंपन्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनने भारताला आपल्या WTO जबाबदाऱ्यांचा आदर करून धोरणांमध्ये बदल करण्याचे आवाहन केले आहे. WTOच्या प्रक्रियेनुसार आता भारत आणि चीन परस्पर चर्चेच्या माध्यमातून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करतील. मात्र, या चर्चेत तोडगा न निघाल्यास प्रकरण विवाद निवारण पॅनेलकडे पाठवले जाऊ शकते. त्यामुळे हा वाद अधिक गंभीर टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे.

चीनने भारताला अचानक धक्का दिल्याची चर्चा

अलीकडच्या काळात भारत आणि चीन या दोन राष्ट्रांत व्यापारी संबंधांमध्ये काहीशी सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, या दोन्ही राष्ट्रांतील व्यापारी तणाव या निमित्ताने या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कठोर टॅरिफ लादल्यानंतर बीजिंगने भारतासोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न वाढवले होते. अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या काळात भारत हा आशियातील एक महत्त्वाचा पर्यायी भागीदार ठरू शकतो, अशी चीनची भूमिका होती. मात्र, आता WTOमध्ये वारंवार तक्रारी दाखल करून चीन भारतावर कूटनीतिक दबाव वाढवत असल्याचे चित्र दिसत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, याच वर्षात चीनने भारताविरोधात WTOमध्ये दाखल केलेली ही दुसरी याचिका आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात चीनने इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी क्षेत्रातील कथित अनुचित सब्सिडीबाबत भारताविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे भारत आणि चीन या दोन राष्ट्रांमधील आर्थिक संबंध पुन्हा एकदा चांगलेच ताणले जाण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.