नवी दिल्ली – आनंदाची बातमी, भारत हा जगातील चौथा सगळ्यात समान समाज असलेला देश झाला आहे. याचाच अर्थ असा की देशात सुरु असलेल्या विकासाचा थेट लाभ लाखो लोकांना होतो आहे.
वर्ल्ड बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, गिनी इंडेक्समध्ये ही माहिती समोर आलीय. या यादीत भारत 167 देशांपेक्षा वर आणि स्लोवाक गणराज्य, स्लोवोनिया आणि बेलारुसच्या खाली आहे.
जगातील सर्वात समान समाज म्हणजे काय?
ज्या देशात उत्पन्नाचं वाटप समप्रमाणात होतं त्या देशांच्या यादीत आता भारत चौथ्या स्थानी पोहचला आहे. याचाच एक अर्थ असा की भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक दरी झपाट्यानं कमी होतेय. भारताचा गिनी इंडेक्स 25.5 इतका आहे. हा आकडा देशात आर्थिक असमानता कमी झाल्याचा निदर्शक आहे. हा स्कोअर स्लोवाक रिपब्लिक, स्लोवोनिया आणि बेलारुसच्या नंतर येतो. मात्र चीन 35.7, अमेरिका 41.8 आणि जी सेव्हन आणि जी 20 देशांपेक्षा चांगला आहे. या निर्देशांकाप्रमाणे जितके कमी आकडे तितकी समानता जास्त आहे.
गिनी इंडेक्स म्हणजे काय?
गिनी इंडेक्स एका अर्थी समानतेचं मोजमाप आहे. कोणत्याही देशात निर्माण होणारं उत्पन्न किंवा संपत्ती किती समानतेनं वाटली जाते, याचा हा निर्देशक आहे. 0 निर्देशांक म्हणजे सगळ्यांचं उत्पन्न समान आहे. आणि 100 निर्देशांक म्हणजे एकाच व्यक्तिकडे सगळं उत्पन्न जातंय.
भारताचा स्कोअर 25.5 इतका आहे. मध्यम रुपातील कमी असमानता श्रेणीमध्ये याची गणना होते. 2011 मध्ये ह निर्देशांक 28.8 असा होता. याचा अर्थ गेल्या काही वर्षांत भारतात समानतेच्या दिशेनं मोठं पाऊच उचललेलं आहे.
भारतानं हे कसं साध्य केलं?
केंद्र सरकारच्या अनेक सरकारी योजना आणि धोरणांमुळे हे सगळं शक्य झाल्याचं सांगण्यात येतंय.
पंतप्रधान जन धन योजनेतून देशात 55 कोटींपेक्षा जास्त बँकेची खाती उघडण्यात आलीयेत. यातून गरीबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आलंय.
आधारच्या माध्यमातून देशातील 142 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना डिजिटल ओळख देण्यात आलीय. यामुळं सरकारी मदत थेट नागरिकांच्या खात्यात पोहचणं सोपं झालेलं आहे. आयुष्मान भारत योजेनेतून 41 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना आरोग्य संरक्षण देण्यात आलंय. देशात 80 कोटी जनतेला फुकट धान्य वाटप करण्यात येतंय.
या सगळ्या योजनेच्या माध्यमातून 2011 ते 2023 या काळात 17.1 कोटी जनता दारिद्रय रेषेच्या वर आले आणि गरिबीचा दर 2.3 टक्क्यांपर्यंत आलाय.





