सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तान गुडघ्यावर, भारताला पाठवली 4 पत्रं

Written by:Smita Gangurde
Published:
सिंधू जल करारावरील केंद्रानं घातलेली बंदी उठवावी यासाठी पाकिस्तानची गयावया सुरु झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रानं हा निर्णय घेतला होता. आतापर्यंत पाकिस्तानकडून याबाबतची 4 पत्रं केंद्राकडे आली आहेत.
सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तान गुडघ्यावर, भारताला पाठवली 4 पत्रं

नवी दिल्ली – पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या करणाऱ्यादहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानची जगात नाचक्की झाली आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं तातडीनं सिंधू जल करार स्थगितीचा निर्णय घेतला होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये पोळलेल्या पाकिस्तानची सिंधू जल करार स्थगितीमुळेही मोठी अडचण झाली आहे.

सिंधू जल करार पुन्हा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तान भारतासमोर गुडघ्यावर आलाय. आत्तापर्यंत पाकिस्ताननं भारताला यासाठी 4 पत्र पाठवली आहेत. यातील एक पत्र ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

सिंधू जल करार का स्थगित

22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर 1960 साली झालेल्या सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. या करारानुसार पूर्वेतील 3 नद्यांचा वापर भारत करु शकतो. यात सतलज, व्यास आणि रावी नद्यांत 3.3 कोटी एकर फूट पाणी आहे. हे सारं पाणी भारताला वापरण्याचा अधिकार आहे.

तर पश्चिमेतील 3 नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार होता. यात झेलम, चिनाब, सिंधू नद्यांतील 13.5 कोटी एकर फूट पाणी आहे. हे पाणी पाकिस्तानचे असल्याचे मान्य करण्यात आले होते आणि या पाण्यातील मर्यादित जलसाठा वापरण्यास भारताला परवानगी होती.

आाता हा करार रद्द झाल्यामुळे पाकिस्तानची मोठी अडचण झाली असून, पाकिस्तानवर जलसंकट ओढावलंय.

या कराराचा जास्त फायदा हा पाकिस्तानला झाला होता. मात्र भारतानं पाण्याच्या बदल्यात शांतता मिळेल, या विचारानं 1960 साली हा जलकरार केला होता. मात्र करारानंतर 5 वर्षांतच 1965 साली पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरवर हल्ला केला. हे हल्ल्याचं सत्र आत्तापर्यंत सुरु आहे.

आता पाण्यासाठी पाकिस्तानची गयावया

आता हे पाणी पुन्हा मिळावं यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतंय. याबाबतची चार पत्रं पाकिस्तान जलसंधारण मंत्रालयाचे सचिव सैयद अली मुर्तजा यांनी जल शक्ती मंत्रालयाला पाठवली आहेत. तर जलशक्ती मंत्रालयानं ही चारही पत्र परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवल्याची माहिती आहे.

Follow Us :GoogleNews