2026 मधील पहिला जनप्रक्षोभ, इराणमध्ये 100 शहरांत महागाईविरोधात निदर्शनं, 45 जणांचा मृत्यू, इंटरनेट-फोन बंद

Written by:Smita Gangurde
Published:
इराणमध्ये गेल्या 13 दिवसांपासून महागाईच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा उद्रेक गुरुवारी पाहायला मिळाला.
2026 मधील पहिला जनप्रक्षोभ, इराणमध्ये 100 शहरांत महागाईविरोधात निदर्शनं, 45 जणांचा मृत्यू, इंटरनेट-फोन बंद

Iran protests : 2025 मध्ये नेपाळ, बांग्लादेश या देशांत जनप्रक्षोभ पाहायला मिळाला. 2026 च्या सुरुवातीलाच असाच जनप्रक्षोभ इराणमध्ये पाहायला मिळतोय. इराणमध्ये गेल्या 13 दिवसांपासून महागाईच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा उद्रेक गुरुवारी पाहायला मिळाला. देशात 100 शहरांत हे आंदोलन पसरलं असून संतप्त जनता रस्त्यावर उतरलीय. संतप्त आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले आहेत. काही ठिकाणी जाळपोळीच्या आणि आगीच्या घटनाही घडल्यात. खामेनेईचा मृत्यू आणि इस्लामिक रिपब्लिनचा अंत अशा घोषणाही आंदोलक देतायेत. ही अखेरची लढाई असून शाह पहलवी परततील अशा घोषणाही देण्यात येतायेत.

अराजकाच्या दिशेनं वाटचाल, 45 जणांचा मृत्यू

या आंदोलनात झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून त्यात 8 लहानग्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. देशात पोलीस आणि जनता हा संघर्ष उद्भवला असून आत्तापर्यंत 2270 जणांना अटक करण्यात आलीय. देशभरातील इंटरनेट आणि फोन बंद करण्यात आले आहेत. तेहरानचं विमानतळही बंद करण्यात आलंय आणि सैन्याला तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

आंदोलनाच्या मागे कोण?

वाढत्या महागाईविरोधात सुरु झालेल्या या आंदोलनानं आता मोठं स्वरुप धारण केलंय. आंदोलनकर्ते संतप्त असून ते रस्त्यावर येऊन हिंसा करतायेत. इराणमध्ये काही संतप्त आंदोलकांनी तर थेट राष्ट्रध्वजच फाडून टाकल्याची धक्कादायक घटना घडलीय. तेहरानमध्ये बाजारपेठा बंद करण्यात आल्यात. विद्यार्थ्यांनी विद्यापीठं ताब्यात घेतली आहेत. इंटरनेट बंद करण्यात आले असले तरी जगभरात स्टारलिंकच्या माध्यमातून तरुणाई हा सगळा प्रक्षोभ पोहचवते आहे.

निर्वासित राजपुत्र रजा पहलवी यांनी गुरुवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन केल्यानंतर देशभरात प्रक्षोभ निर्माण झालाय. इराणचे शेवटचे शाह मोहम्मद रजा पहलवी यांचे रजा पहलवी हे पुत्र आहेत. 1979 साली त्यांच्या पित्याला देशात झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर त्यांना सत्तेवरुन हटवण्यात आलं होतं. युवराज पहलवी सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

ट्रम्प यांचा आंदोलकांना पाठिंबा

या आंदोलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलाय. आंदोवनकर्त्यांना मारण्यात आलं तर अमेरिका इराणवर हल्ला करेल, असा संदेश देण्यात आलाय. रजा पहलवी यांनी ट्रम्प यांचं कौतुक केलंय. ट्रम्प यांनी सरकारला जबाबदार धरण्याचं काम केलं असंही ते म्हणालेत.

महागाईविरोधात मोठा रोष

महागाईविरोधात इराममधील जनता संतप्त झालेली आहे. जेन झीमध्ये मोठा आक्रोश दिसतोय. देशाची ढासळती आर्थिक व्यवस्था हे यासाठी कारण आहे. डिसेंबर 2025 मध्ये इराणचं चलन रियाल हे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चांगलचं आपटलंय. एका अमेरिकन डॉसरच्या तुलनेत रियालचा दर 1.45 दशलक्ष इतकं कमी आहे. हा आत्तापर्यंतचा निचांक मानण्यात येतोय. रियालच्या घसरणीमुळे अन्नपदार्थाची महागाई वाढलेली आहे. अन्नधान्य 75 टक्क्यांनी तर औषधं 50 टक्क्यांनी महागलीत. यासह सरकारनं जनतेवर 2026 च्या बजेटमध्ये 62 टक्के कर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळं मोठी नाराजी पसरलीय

Follow Us :GoogleNews