इराणचे प्रमुख खामेनेई यांनी केली इस्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा, अमेरिकेची मध्यस्थी थेट नाकारली

Written by:Smita Gangurde
Published:
इस्रायल विरुद्धच्या  इराणच्या युद्धात अमेरिका सैन्यानं हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम वाईट होतील, असंही ते म्हणाले.
इराणचे प्रमुख खामेनेई यांनी केली इस्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा, अमेरिकेची मध्यस्थी थेट नाकारली
तेहरान – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी इस्रायलसोबत युद्ध सुरु झाल्याची जाहीर घोषणा केली आहे. बुधवारी त्यांनी दिलेल्या एका संदेशात स्पष्ट केलं की, इराण या युद्धात शरणागती पत्करणार नाही. अमेरिकनं याचं भान बाळगावं आणि अमेरिकेनं यात मध्यस्थी करु नये असंही खामनेई यांनी स्पष्ट केलंय. इस्रायल विरुद्धच्या  इराणच्या युद्धात अमेरिका सैन्यानं हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम वाईट होतील, असंही ते म्हणालेत.

इराणनं आतापर्यंत कुणाच्याही धमक्यांना भीक घातलेली नाही, हे सांगत इस्रायलनं मोठी चूक केली असून या राष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागतील असं या संदेशात स्पष्ट करण्यात आलंय. थोपवण्यात आलेली शांतता आणि युद्ध दोन्हीही इराणला नामंजूर असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. खामेनेई यांचा हा संदेश इराणच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर वाचून दाखवण्यात आला.

व्हॉट्सअॅप डिलीट करण्याचे आदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी अशी मागणी केली होती. इराणचे सर्वोच्च नेते कुठे लपले आहेत हे माहीत आहे, पण त्यांना मारणार नाही, असाही मेसेज ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिला होता.

इराणकडून यावर तीव्र पलटवार करण्यात आला आहे. इराणच्या जनतेनं त्यांच्या स्मार्टफोनमधून व्हॉट्सअप अॅप डिलिट करण्याचे आदेश सरकारच्या वतीनं देण्यात आले आहेत. या अॅपमधून इराणी नागरिकांची माहिती इस्रायलला पाठवण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.

आतापर्यंत संघर्षात 585 जणांचा मृत्यू

इराण आणि इस्रायलमध्ये 13 जूनपासून संघर्, सुरु झाला आहे. या संघर्षात आत्तापर्यंत 585 जणांचा मृत्यू आणि 1300 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचा दावा करण्यात येतोय. वॉशिंग्टनमधील मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेनं ही माहिती दिली आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध

इराण आणि इस्रायलमध्ये 13 जूनपासून युद्ध सुरु असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर मिसाईल, ड्रोनद्वारे हल्ला करण्यात येतोय. इराणच्या हल्ल्यात आत्तापर्यंत फारसं नुकसान झालं नाही असा दावा इस्रायच््या वतीनं करण्यात आलाय. इराणनं आत्तापर्यंत 400 बॅलेस्टिक मिसाईल आणि 1000 ड्रोन डागल्याचं इस्रायलच्या वतीनं सांगण्यात आलंय. यात 24 जणांचा मृत्यू झाला असून 500 जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलंय.

तर इराणवर इस्रायलचे हल्ले सुरु आहेत. इराणच्या अंतर्गत सुरक्षा मुख्यालयाला इस्रायलच्या फायटर जेट्सनी टार्गेट केल्याची माहिती इस्रायलच्या वतीनं देण्यात आलीय. इराणमधील भारतीयांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इराणमधून 110 भारतीय विद्यार्थी आज विमानानं देशात परतण्यासाठी निघाले आहेत.