Marathi News

‘सुरूवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार’, इराणचा अमेरिका आणि इस्रायलला सज्जड दम

Written by:Rohit Shinde
Published:
अमेरिकेने इराणच्या अणुतळांवर हल्ले केल्यानंतर आता इराणने दोन्ही देशांना धमकीवजा इशारा दिला आहे. आता याचा शेवट आम्ही करणार, असं इराणने म्हटलं आहे.
‘सुरूवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार’, इराणचा अमेरिका आणि इस्रायलला सज्जड दम

अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथे हा हल्ला करण्यात आला असून तो पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य पूर्वेतील संघर्षात आता अमेरिका थेटपणे सहभागी झाली आहे. इराणच्या अणुतळांवरील हल्ल्याची माहिती खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे, त्यामुळे अमेरिकेने आता या युध्दात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे आता इराण चवताळला असून इराणने अमेरिका आणि इस्रायलला सज्जड दम दिला आहे.

इराणचा अमेरिका-इस्रायलला इशारा

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे तिन्ही आण्विक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतर इराण प्रचंड संतापला आहे. इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन अमेरिकेला इशारा दिला आहे. ‘युद्ध तुम्ही सुरु केलं आहे, शेवट आम्ही करु. आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आमचं लक्ष्य असेल’, अशी धमकी इराणने दिली आहे. त्यामुळे आता मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या सगळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतावर विपरीत पडसाद होण्याची दाट शक्यता आहे. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

इराणच्या राष्ट्र प्रमुखांना इस्रायलची भीती?

गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांचे युद्ध सुरु आहे. इस्रायली लष्कराकडून सातत्याने इराणी अणुशास्त्रज्ञ आणि इराणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलकडून अयातुल्ला खामेनी यांची हत्या करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे खामेनी यांनी त्यांना काही झाल्यास आपले तीन उत्तराधिकारी निवडले आहेत. त्यामुळे आता मध्य-पूर्वेतील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews