इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये हाहाकार; तीन दिवसांत 244 नागरिकांनी गमावला जीव!

Written by:Rohit Shinde
Published:
इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. त्यामुळे जगभरात एकच खळबळ माजली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये हाहाकार; तीन दिवसांत 244 नागरिकांनी गमावला जीव!

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायली हल्ल्यांमध्ये  244 लोकांचा मृत्यू 1200 हून अधिक जखमी झाल्याचं इराणच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी  सांगितलं आहे.  इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन करमनपौर म्हणाले, 65 तासांच्या इस्रायली बॉम्बस्फोटानंतर एकूण 1,277 लोक जखमी झाले आहेत. 244 मृतांमध्ये महिला पुरुष आणि मुलांचा समावेश आहे .मृतांपैकी 90% लोक हे इराणचेच नागरिक असल्याचंही इराणने सांगितले आहे. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले चढवत आहेत .  इस्रायली हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नासधूस, विध्वंस झाला असून मोठी जीवित हानी झाली.

इराणवर कारवाई सुरूच राहणार -नेतान्याहू

इस्रायल इराणच्या विरुद्ध लष्करी कारवाई सुरूच ठेवेल असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.नइराणची अणूस्थळे, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी धोकादायक असल्याने त्यांना नष्ट करणे आवश्यक आहे . ‘आमची दोन प्रमुख उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आम्ही जे आवश्यक आहे ते करू .पहिलं म्हणजे अणूशस्त्रांचा धोका आणि दुसरं क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका “असे नेतान्याहू म्हणाले .आम्ही हे पाऊल स्वतःच्या सुरक्षेसाठी उचलले आहे,परंतु आमचे उद्दिष्ट केवळ स्वतःला वाचवणे नाही तर जगाला या धोकादायक सरकार पासून वाचवणे आहे.जगातील सर्वात धोकादायक सरकारकडे ही शस्त्रे नसावीत, असेही नेतान्याहू म्हणाले.

इस्रायलमध्ये मोठी जीवितहानी ?

दुसरीकडे शुक्रवार, 12 जूनपासून सुरू असणाऱ्या हल्ल्यांमध्ये 14 लोकांचा मृत्यू आणि 390 जण जखमी झाल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे . एएफपीच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्याने रविवारी इस्रायलच्या हल्ल्यांचा बदला घेतला जाईल असा इशारा दिला होता .कर्नल रेझा सय्यद म्हणाले की इराणच्या शूर सैनिकांचा बदला संपूर्ण इस्रायल व्यापून टाकेल . “इस्रायलने व्यापलेले क्षेत्र सोडा, कारण आता इस्रायल भविष्यात राहण्याजोगेही राहणार नाही . आश्रयस्थानंही तुमचं संरक्षण करू शकणार नाहीत . ” त्यामुळे या युध्दजन्य काळात इस्रायलमध्ये देखी मोठी जीवितहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत आणखी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.