Jaisalmer Bus Fire: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये धक्कादायक घटना; धावत्या बसला आग, 20 प्रवाशांचा मृत्यू

Written by:Rohit Shinde
Published:
जैसलमेरमध्ये एका धावत्या बसला आग लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 20 प्रवाशांनी आपला जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे.
Jaisalmer Bus Fire: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये धक्कादायक घटना; धावत्या बसला आग, 20 प्रवाशांचा मृत्यू

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका धावत्या बसला आग लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात भाजल्याने 16 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जोधपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले आहे, तसेच पंतप्रधान मदत निधीतून मदतीची घोषणा देखील केली आहे. राजस्थानमधील जैसलमेर हा भाग पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू

मंगळवारी दुपारी भीषण अपघातात एका खासगी बसमध्ये आग लागून 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस सुमारे 57 प्रवाशांना घेऊन जैसलमेर येथून जोधपूरकडे निघाली होती. प्रवास सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच बसच्या मागील भागातून धूर येऊ लागला. चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली, पण क्षणातच बसला भीषण आग लागली आणि ती संपूर्ण बसमध्ये पसरली.

निक नागरिक, वाटसरू आणि लष्करी जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. अग्निशमन दल व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. गंभीर जखमींना जैसलमेर येथील जवाहर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून 16 जणांना पुढील उपचारांसाठी जोधपूरमध्ये हलवण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तांत्रिक बिघाडामुळे आग लागली?

जैसलमेर पोलिस आणि प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही. पोलिसांनी बस चालक आणि कंडक्टरची चौकशी सुरू केली आहे. स्थानिक प्रशासनाने जखमींवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था केल्या जातील असे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने जनतेला अफवांकडे दुर्लक्ष करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. घटनेनंतर जैसलमेर-जोधपूर मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली आहे. पोलिस आणि प्रशासन सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी काम करत आहेत.

पंतप्रधान निधीतून मदतीची घोषणा

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. या अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews