तेहरान – इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात इराणच्या सुरु असलेल्या युद्धात आता रशइयाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामनेई यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास आराकची यांनी मॉस्कोत पुतीन यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
या भेटीत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून खामेनेई यांचं एक पत्र पुतीन यांना देण्यात आलंय, या पत्रात इस्रायलच्या विरोधात मदत करण्याचं आवाहन रशियाला करण्यात आल्याची माहिती आहे. रशियाकडून कशा स्वरुपाची मदत इराणला हवी आहे, याची स्पष्टता मात्र अद्याप आलेली नाही.
इस्रायलचे इराणवर हल्ले सुरुच
इस्रायलविरोधात गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध अजूनही सुरुच आहे. इराणवर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलकडूनही हल्ले सुरुच आहेत. इराणी सैन्यावर इस्रायलकडून सोमवारीही हल्ले करण्यात आलेत. या हल्ल्यात इराणचे शेकडो सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आलाय.
सीरियात अमेरिकेच्या लष्करी तळा वर हल्ला
दुसरीकडे सीरियात हसाका प्रांतामध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला इराणने केला की इसिस या दहशतवादी संघटनेनं केला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांच्या जागी हल्ले केल्यानंतर अमेरिकेला इराणनं हे प्रत्युत्तर दिलं असल्याचं सांगण्यात येतंय.
तेहरानच्या नागरिकांना शहर रिकामं करण्याचा इशारा
इराण विरुद्ध इस्रायल संघर्ष चांगलाच तापला असून, तेहरानच्या नागरिकांना शहर रिकामं करण्याचा इशारा इस्रायलच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती आहे. तेहरान आणि परिसारतील सैन्यांच्या तळावर येत्या काही काळात हल्ले करण्यात येतील अशा इशारा इस्रायलच्या वतीनं देण्यात आलाय.
तेल कंपन्यांनी इराणमधून परदेशी नागरिकांना कामावरुन काढलं
इराणमध्ये तेल कंपन्यात काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलंय. या हल्ल्यानंतंरही इराणच्या दक्षिणेतील तेल क्षेत्रातील निर्यात अद्याप सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. प्रतिदिनी ३.३२ दशलक्ष बॅरल्सची निर्यात होत असल्याची माहिती इराणच्या वतीनं देण्यात आलीय. आता या संघर्षात रशियानं दखल दिल्यास या संघर्षाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाकडे होण्याची भीती वर्तवण्यात येतेय.





