महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन एनडीएच्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, 21 ऑगस्टला नामांकन करणार दाखल

Written by:Smita Gangurde
Published:
एनडीएचे सर्व खासदार राधाकृष्णन यांना मतदान करतील अशी आशा आहे. अशा स्थितीत सत्तारुढ एनडीएला दोन्ही सभागृहात मिळून 422 खासदारांचा पाठिंबा आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी 391 खासदारांची गरज आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन एनडीएच्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, 21 ऑगस्टला नामांकन करणार दाखल

नवी दिल्ली– महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार असणार आहेत. रविवारी भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर भाजपा कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली.

भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. राधाकृष्णन हे 21 ऑगस्टला त्यांचं नामांकन दाखल करणार आहेत. यावेळी एनडीएच्या राज्यांतील सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असतील.

सी पी साधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द

सी पी राधाकृष्णन यांचं पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन असं आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 साली तामिळनाडूतील तिरुपर या ठिकाणी झाला. वय वर्ष 16चे असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. 1998 ते 99 या काळात ते कोईंबतूर मतदारसंघातून खासदार झाले. 2004 ते 2007 या काळासाठी ते तामिळनाडूच्या प्रदेश भाजपाचे अध्यक्ष होते. 2016 ते 2020 या काळात ते कोअर बोर्डाचे अध्यक्ष होते 2020 ते 2022 या काळात त्यांनी केरळच्या भाजपा प्रभारीपदाची जबाबदारीही स्वीकारली. 2023 साली त्यांची नेमणूक झारखंडच्या राज्यपालपदी करण्यात आली. त्यानंतर 2024 साली त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कधी?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होईल. नामांकन दाखल करण्याची अखेरची तारीख 21 ऑगस्ट आहे. 25 ऑगस्टपर्यंत उमेगवारी अर्ज मागे घेण्याची मुभा आहे.

21 जुलैला जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं आहे. 74 वर्षीय धनखड यांच्या कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंतचा होता.

एनडीएच्या बाजूने कौल

लोकसभेत सध्या एकूण खासदारांची संख्या ही 542 आहे. एक जागा रिकामी आहे. एनडीएचे लोकसभेत 293 खासदार आहेत. तर राज्यसभेची एकूण संख्या 245 आहे, त्यातील 5 जागा रिक्त आहेत. राज्यसभेत एनडीएचे 129 खासदार आहेत. एनडीएचे सर्व खासदार राधाकृष्णन यांना मतदान करतील अशी आशा आहे. अशा स्थितीत सत्तारुढ एनडीएला दोन्ही सभागृहात मिळून 422 खासदारांचा पाठिंबा आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी 391 खासदारांची गरज आहे.

ऑगस्ट 2022 साली एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना 528 मतं मिळाली होती. तर विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली होती. त्यावेळी 56 खासदारांनी मतदान केलं नव्हतं.

Follow Us :GoogleNews