राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्यांच्या हिंदुत्ववादासाठी ओळखला जातो. हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व असं संघाकडून अनेकदा बोललं जातं. अशातच आता संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूचा अर्थ सांगत 4 प्रकारही सांगितले आहेत. मोहन भागवत यांच्या मते हिंदू असणे म्हणजे भारतमातेचे वंशज आणि भारतासाठी जबाबदार असणे. भारतासाठी लढणारे सर्व हिंदू आहेत. सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज देखील याच भूमीतून आले आहेत, म्हणून ते सर्व हिंदू आहेत.
हिंदूंचे 4 प्रकार कोणते
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर बेंगळुरू येथील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, हिंदू हे 4 प्रकारचे आहेत. पहिला हिंदू म्हणजे ज्याला त्याच्या ओळखीचा अभिमान आहे. दुसरा हिंदू म्हणजे जे स्वतःला हिंदू म्हणतात परंतु त्यांना त्याचा अभिमान वाटत नाही. तिसरा हिंदू म्हणजे जो स्वतःला खाजगीर ते हिंदू म्हणतो परंतु नफा किंवा तोट्याच्या भीतीने सर्वांसमोर हिंदू असल्याचं मान्य करत नाही. आणि चौथा हिंदू म्हणजे जो स्वतःला हिंदू असल्याचच विसरला आहे.
संघाचे कौतुक (Mohan Bhagwat)
मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. संघ ही एक अद्वितीय संघटना आहे. संपूर्ण जगात असा कोणीही नाही. संघाचे उद्दिष्ट विनाश नाही तर परिपूर्णता स्थापित करणे, संपूर्ण समाजाला एकत्र करणे हे संघाचे काम आहे. संघाला सत्तेसाठी नाही तर भारतमातेच्या गौरवासाठी हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे. संघाच्या कार्यासाठी बाहेरून एकही पैसा घेतला जात नाही. संघ त्याच्या शाखांमधील प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण देतो आणि त्यांना फक्त भारतमातेबद्दल विचार करण्यास शिकवतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण समाजाचे संघटन करण्यासाठी आणि व्यक्तींचा विकास करण्यासाठी एक पद्धत विकसित केली आहे.






