प्रयागराजमध्ये धार्मिक वादंग, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं 3 दिवसांपासून धरणे आंदोलन

Written by:Smita Gangurde
Published:
आता या वादाला राजकीय स्वरुपही प्राप्त होताना दिसतंय. सपाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही अविमुक्तेश्वरानंदांना पाठिंबा दर्शवलाय
प्रयागराजमध्ये धार्मिक वादंग, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं 3 दिवसांपासून धरणे आंदोलन

प्रयागराज- एकीकडे वाराणसीत मणिकर्णिका घाटावरुन राजकारण तापलेलं असताना, दुसरीकडे प्रयागराजमध्ये एक नवा वाद निर्माण झालाय. पालखी अडवल्याच्या कारणावरुन शंकराचार्य म्हणवणारे अविमुक्तेश्वरानंद हे तीन दिवस निदर्शनाला बसलेले आहेत. प्रशासन आणि अविमुक्तेश्वरावंद वाद आता थेट शंकराचार्य आहात का, इथपर्यंत पोहचलाय.

काय आहे वाद ?

एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे प्रयागराजमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं हे धरणं आंदोलन सुरुय. मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज तीर्थावर शंकराचार्यां दरवर्षी पालखीतून स्नानाला जातात. यंदाच्या मौनी अनावस्येला शंकराचार्य अविमुक्तेश्वरांची पालखी पोलिसांनी अलिकडे थांबवली. तिथून पुढे पायी संगमावर जावे असे पोलिसांनी शंकराचार्यांना सांगितलं. शिष्य ऐकत नसल्यानं पोलीस आणि शिष्यांत धक्काबुक्की झाली. काही जणांना मारहाणही करण्यात आली. यात संतापलेल्या अविमुक्तेश्वरानंदांनी धरणं आंदोलन सुरु करत शिष्यांना सोडण्याची मागणी केली.

प्रशासनाकडून माफीची मागणी

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बधले नाहीत. अखेरीस प्रशासनानं पालखी संगमापासून एक किलोमीटर लांब नेली, यात पालखीचा एक भाग तुटला. शंकराचार्य स्नान करु शकले नाहीत. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून प्रशासनानं माफी मागावी या मागणीसाठी अविमुक्तेश्वरानंद हे धरणं आंदोलन करतायेत.

शंकराचार्य असल्याचं सिद्ध करा- प्रशासन

या सगळ्या वादानंतर मेळा प्रशासनानंही अविमुक्तेशवरानंदांच्या विरोधात भूमिका घेतलीय.
अविमुक्तेश्वरानंद यांनी शंकराचार्य असल्याचं २४ तासांत सिद्ध करावं अशी नोटीसच आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात आलीय.

काय आहे नोटिशीत?

1. अविमुक्तेश्वरानंद यांच्या शंकराचार्य पदाचा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित
२. अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कुणालाही शंकराचार्य घोषित केले जाऊ शकत नाही-कोर्ट
3. 2022 साली दिलेल्या आदेशानंतर कोर्टाचा नवीन आदेश नाही
4.अविमुक्तेश्वरानंदांनी शिबिरात जोतिष्पीठाचे शंकराचार्य असा केलेला उल्लेख निर्णयाचे उल्लंघन
5. शंकराचार्य असल्याचं अविमुक्तेश्वरानंदांनी सिद्ध करावं

दुसरीकडे अविमुक्तेश्वरानंद हेही माघार घेण्यास तयार नाहीयेत. शंकराचार्यांच्या चार पिठांपैकी दोन पिठांनी शंकराचार्य म्हणून मान्यता दिल्याचं अविमुक्तेश्वरानंदांचं म्हणणंय. गेल्या माघ मेळ्यात इतर दोन शंकराचार्यांसोबत स्नान केल्यानं आणखी कोणता पुरावा हवाय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शंकराचार्य कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार केवळ शंकराचार्यांनाच असल्याचं त्यांचं म्हणणंय.

शंकराचार्यपदाचा वाद

अविमुक्तेश्वरानंद यांच्या शंकराचार्यपदाबाबही वाद आहे

१. 1989 साली बोधश्रमाच्या मृत्यूनंतर ज्योतिर्पीठाचे दोन शंकराचार्य
2. संत स्वरुपानंद सरस्वती यांच्या पाठोपाठ संत शतानंद यांनी उत्तराधिकारी असल्याचं केलं घोषित
3. शंकराचार्य नेमकं कोण, याचा वाद सुरु राहिला
4. 2022 साली संत स्वरुपानंद यांचं निधन
५. दुसऱ्या दिवशी अविमुक्तेश्वरानंदांनी स्वत:ला शंकराचार्य म्हणून केले घोषित

आता या वादाला राजकीय स्वरुपही प्राप्त होताना दिसतंय. सपाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही अविमुक्तेश्वरानंदांना पाठिंबा दर्शवलाय. आता या वादात अविमुक्तेशंवरानंद की प्रशासन कोण माघार घेणार हे पाहावं लागणार आहे.

 

Follow Us :GoogleNews