बिहार विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या देशात गेल्या काही महिन्यांपासून बिहार विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा सुरू होती. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनडीएचं जागा वाटप आज निश्चित झालं आहे. आज जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता मी मोठी घडामोड घडताना दिसत आहे.
बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं!
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. भाजप आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार उतरवणार आहेत. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 29 जागा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाला आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी सांगितले की, एनडीएतील सर्व घटकांनी परस्पर सहमती आणि मैत्रीपूर्ण वातावरणात जागांचे वितरण पूर्ण केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत एकजुटीने लढण्याचा निर्धार एनडीएने केला आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा?
भाजप– 101 जागा
जदयू– 101 जागा
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)– 29 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा– 6 जागा
हिंदुस्तानी अवाम मोर्चा– 6 जागा
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
मतचोरीचे गंभीर आरोप, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या अनेक योजना, महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आलेले पैसे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान घेतलं जाईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजप हा सत्तेतला, तर राजद हा विरोधी बाकांवरील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप आणि राजदचे ७० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत आहेत. दोन्ही बड्या पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे.
राज्यात एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यामधील ३.९२ पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. ७.२ लाख दिव्यांग मतदार आहेत. राज्यातील तरुण मतदारांचा (२० ते २९ वर्षे) १.६३ कोटींच्या घरात आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४.०१ लाख इतकी आहे.





