15 जूनला होणारी NEET PG परीक्षा स्थगित, नव्या तारखेची लवकरच घोषणा

Written by:Rohit Shinde
Published:
15 जूनला होणारी NEET PG परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नव्या तारखेची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे...
15 जूनला होणारी NEET PG परीक्षा स्थगित, नव्या तारखेची लवकरच घोषणा
15 जूनला होणारी NEET PG परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने स्थगित केली आहे. अधिक परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्याच्या कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे. यावेळी जारी करण्यात आलेल्या नोटीसीमध्ये ही परीक्षा एकााच सत्रात घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, एका सत्रात परीक्षा घेण्याच्या निर्णयावर परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी आक्षेप नोंदवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन (NBE) ला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की परीक्षा केवळ एका सत्रातच आयोजित केली जावी. ही टिप्पणी कोर्टाने त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केली होती, ज्यामध्ये NEET PG 2025 परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्याच्या NBE च्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. ही याचिका युनायटेड डॉक्टर्स फ्रंटच्या वतीने दाखल करण्यात आली होती. याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती की ही परीक्षा संपूर्ण देशभरात एकाच सत्रात आयोजित केली जावी.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे NEET PG 2025 परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेऊ नये. कोर्टाने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, जर परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली गेली, तर त्यामुळे मनमानीपणा आणि अडचणींच्या विविध पातळ्या निर्माण होऊ शकतात.

विद्यार्थ्यांनी नोंदवला स्थगितीवर आक्षेप

नीट पीजी परीक्षा अचानक स्थगित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून, त्यांनी सोशल मीडियावर तसेच विविध माध्यमांतून आपला विरोध नोंदवला आहे. परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, असा निर्णय घेणे अन्यायकारक असल्याचे मत विद्यार्थ्यांचे आहे. अनेकांनी अभ्यासासाठी आपले वेळापत्रक, मानसिक तयारी आणि आर्थिक गुंतवणूक यावर भर दिला होता. हा निर्णय त्यांच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी याचा गंभीर विचार करून स्पष्ट आणि स्थिर निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.