नेपाळ मधील अनागोंदी (Nepal Protest) थांबण्याचे काही नाव घेईना… पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्या नंतर सुद्धा नेपाळ मधील तरुणांचा उद्रेक थांबत नाही. आज तर या संतप्त तरुणांनी संसद भवन पेटवून दिले. त्याचसोबत नेपाळच्या न्यायालयाला सुद्धा आग लावण्यात आली. संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
खर तर आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेपाळ सरकारने कर्फ्यू जाहीर केला होता. मात्र त्यानंतर हे आंदोलन आणखी चिघळले. रस्त्यावर उतरलेल्या हजारो तरुणांनी मंत्र्यांची घरे जाळली. त्यानंतर या तरुणांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या खाजगी निवासस्थानांवर कब्जा करून त्यांना आग लावली आहे. संतप्स आंदोलकामनी नेपाळी काँग्रेसचे केंद्रीय कार्यालय पेटवले, त्यानंतर संसद भवनालाही आग लावली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे.
पंतप्रधान दुबईला पळण्याच्या तयारीत – Nepal Protest
नेपाळच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सैन्य हेलिकॉप्टरने मंत्र्यांना बाहेर काढत आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह नेपाळच्या गृहमंत्री, आरोग्य मंत्री, कृषिमंत्र्यांसह दहा मंत्र्यांनी राजीनामा दिला. उपचाराचं कारण देत केपी ओली दुबईत पळ काढण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.
नेपाळ मधील अनागोंदी चे कारण काय?
नेपाळ सरकारने 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, वॉट्सऐप, रेडिट आणि X सारख्या 26 सोशल मीडिया ऐप्सवर बंदी घातली आहे. या बंदीचे मोठे पडसाद नेपाळ मध्ये पाहायला मिळाले. सोशल मीडियाच्या बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे असे या तरुण आंदोलकांचे म्हणणं आहे. आधीच नेपाळ मध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीवरून सरकार वर नाराजी आहे. त्यात आता सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केल्याने खास करून युवकांमध्ये संताप उसळला. या बंदीविरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हजारो Gen-Z तरुणांनी हिंसक निदर्शने केली. (Nepal Protest) यादरम्यान शेकडो तरुण नेपाळच्या संसदेत घुसले.आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून आणि गेट ओलांडून न्यू बानेश्वर येथील संघीय संसद परिसरात घुसखोरी केली.






