Padma Awards 2026 List: भारत सरकारने प्रजासत्ताक दिनापूर्वी यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. २०२६ च्या पद्म पुरस्कारांची यादी आता समोर आली आहे. या यादीत देशभरातील विविध क्षेत्रात दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणाऱ्या मान्यवरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी ही घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती या सर्व आपआपल्या क्षेत्रातील दिग्गज विजेत्यांना पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रपती भवनात त्यांचा सन्मान होईल. यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे सन्मान देण्यात आले आहेत.
यंदाच्या यादीतील विजेत्यांपैकी पाच जणांना पद्मविभूषण, १३ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या वर्षीच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत एकूण १३१ राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.ज्यात अनेक सिनेसृष्टीतील व्यक्तींचा समावेश आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र ते सतीश शाह यांच्यापर्यंत, भारतीय मनोरंजन क्षेत्रातील अनेक नावांचाही देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रातील कोणाकोणाला मिळाला पुरस्कार?
यंदाच्या पद्म पुरस्करांच्या यादीत महाराष्ट्रातील ४ दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये आदिवासी संस्कृती जतन करणारे भिकल्या लाडक्या धिंडा यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारे प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनाही हा सन्मान प्राप्त झाला आहे. मुंबईतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि शिशुतज्ज्ञ डॉ. आर्मीडा फर्नांडिस यांनाही हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत हा सन्मान जाहीर झाला आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





