नवी दिल्ली- आपला शेजारी असलेला चीन आज अस्वस्थ आहे. इथं भारतात आपण कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, चीनमध्ये थेट लष्कराच्या जनरललाच तुरुंगात टाकलं गेलंय. कारण याच जनरलने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मारण्याचा कट उधळला गेलाय. तुम्ही फार काळ एकाधिकार गाजवलात, तर सत्तेला सुरूंग आतूनही लागू शकतो, हा धडा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे.
चीनमध्ये काय सुरुये उलथापालथ?
शेजारच्या चीनमध्ये सुरू असेलेली ही उलथापालथ जगाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. कारण, जागतिक राजकारणात उलथापालथ करणाऱ्या घटना सध्या घडताहेत. अमेरिका, रशिया आणि चीन या महासत्तांच्या साठमारीत जगभरातील अनेक देश आपोआप गुरफटत चाललेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड, इराणबद्दलच्या भूमिकांमुळे ‘काहीही घ़डू शकतं’ असं बोललं जातंय. तर, दुसरीकडे चीनच्या लष्करात बंडाळी झाल्याची चर्चा असून, थेट राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाच जीवे मारण्याचा कट उधळला गेल्याच्या बातम्या आहेत.
हे ही वाचा
स्वतःभोवती भिंती बांधून असलेल्या चीनमध्ये खरंच काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. कारण तिथला मीडियाही तेच दाखवतो जे त्यांच्या सरकारला दाखवायचंय. तरीही कुठून ना कुठून बातम्या बाहेर येतातच. गेल्या काही दिवसात चीनमध्ये जबरदस्त अंतर्गत कलह झाल्याचं कळत असून, चीनच्या लष्करामध्ये मोठी साफसफाई सुरू आहे. कारण चीनच्या लष्करातील काही अधिकाऱ्यांनी गेली १३ वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्राध्यक्षांनाच जीवे मारण्याचा कट रचल्याचं उघड होतंय.
नक्की काय घडलं ?
जिनपिंग यांच्या हत्येचा एक मोठा कट उघड झाल्याची चर्चा आहे. जनरल झांग युक्सिया यांनी हा कट रचल्याची शंका आहे. जनरल युक्सिया हे जिनपिंग यांचे जवळचे सहकारी असल्याचं सांगण्यात येतंय. जिनपिंग मुक्कामाला असलेल्या हॉटेलवर हल्ला झाल्याची माहिती आहे. पण, कटाची माहिती मिळाल्याने जिनपिंग सुरक्षित निसटले.युक्सियांवर अमेरिकेला गुप्त माहिती पुरवल्याचाही संशय आहे. त्यामुळे युक्सियांना पदावरून हाकलले आणि कोठडीत रवानगी करण्यात आलीय.
लष्करातील मित्रालाही सोडलं नाही
झांग युक्सिया यांची अटक म्हणजे शी जिनपिंग यांनी लष्करातील आपल्या सर्वात जवळच्या आणि शक्तिशाली मित्रालाही सोडलेले नाही, असा संदेश आहे. या कारवाईमुळे चिनी लष्कराचे कमांड स्ट्रक्चर सध्या पूर्णपणे कोलमडल्याचे बोलले जात आहे. २०२३ पासून आतापर्यंत चीनमध्ये दोन उपाध्यक्ष, तीन लष्करी आयोग सदस्य, माजी संरक्षण मंत्री आणि डझनावारी वरिष्ठ जनरलना ‘पर्ज’ म्हणजे शुद्धिकरण मोहिमेंतर्गत हटवण्यात आलंय.
चीनमध्ये नेकेड अधिकाऱ्यांवर कारवाई
या मोहिमेचा मुख्य हेतू केवळ भ्रष्टाचार संपवणे हा नसून, लष्करासह सर्व संस्थांवर शी जिनपिंक यांचा एकाधिकार ठामपणे सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण त्यांना या सगळ्यामागे ‘परदेशी हात’ असल्याची शंका येते. त्यासाठीच त्यांनी ‘नेकेड’ अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केलीय.
नेकेड अधिकारी म्हणजे काय?
नेकेड अधिकारी म्हणजे जे चीनमध्ये एकटेच राहतात. ज्यांचे कुटुंबीय (पत्नी, मुले) परदेशात स्थायिक झालेत, ज्यांनी आपली मोठी मालमत्ता परदेशात हलवलीय. अशा अनेक अधिकाऱ्यांना चीननं हाकलून दिलंय. हे अधिकारी फितुरी करताहेत, असा त्यांच्यावर संशयआहे. झांग युक्सिया यांच्यावरही अशाच फितुरीचा आरोप आहे.
सध्या चीनमध्ये सुरू असलेली ही मोहीम माओ त्से तुंग यांच्या काळानंतरची सर्वात मोठी लष्करी शुद्धिकरण मोहीम मानली जात आहे. कारण एकाधिकारशाहीच्या या किल्ल्याला आतूनच खिंडार पडू लागलंय. हे खिंडार दाबलेल्या आंकाक्षांचं आहे. त्यामुळे आज हुकुमशाही पद्धतीनं बंड रोखलं जात असलं, तरी एक दिवस ते पुन्हा उसळल्याशिवाय राहणार नाही. तियानमान स्क्वेअरचा इतिहास अद्यापही प्रत्येक चीनी माणूस विसरलेला नाही. त्यामुळे पुढील काळात चीनमध्ये काय होतं, हे फक्त चीनसाठीच नाही तर जगासाठीही महत्त्वाचं आहे.