Chenab Bridge : अलीकडेच कटरा आणि श्रीनगर दरम्यान सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रचंड यशस्वी ठरली आहे. या ट्रेनचे पुढील एका आठवड्यासाठी कोणतीही तिकिटे उपलब्ध नाहीत. जर तुम्हाला आत्ताच प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल किंवा पुढील आठवड्यातील तारखेसाठी सीट बुक करावी लागेल. IRTC च्या अधिकृत वेबसाइटनुसार, या ट्रेन्समध्ये सर्व सीट्स फुल आहेत आणि वेटिंग लिस्ट सुरू आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही शहरांदरम्यान दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्स चालवल्या जात आहेत, ज्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्क ब्रिज चेनाब रेल्वे ब्रिजवरून जातात.
एक आठवड्यासाठी सीट्स उपलब्ध नाहीत
IRCTC च्या वेबसाइटनुसार, ही बातमी लिहीपर्यंत एसी चेअर कारसाठी 11 जूनसाठी 142, 12 जूनसाठी 118, 13 जूनसाठी 73, 14 जूनसाठी 73, 15 जूनसाठी 49, 16 जूनसाठी 13 आणि 18 जूनसाठी 33 वेटिंग दाखवले जात आहे. एग्जिक्युटिव्ह चेअर कारमध्येही वेटिंग सुरू आहे. म्हणजेच, या तारखांसाठी कोणतीही सीट उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला या तारखांनंतरचं तिकीट बुक करावं लागेल.
तिकीट दर किती आहे?
कटरा ते श्रीनगर प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारचे तिकीट 715 रुपये आहे, तर एग्जिक्युटिव्ह चेअर कारसाठी 1320 रुपये भरावे लागतात. त्याउलट, श्रीनगरहून कटरा प्रवासासाठी एसी चेअर कारचे तिकीट 880 रुपये आणि एग्जिक्युटिव्ह चेअर कारचे 1515 रुपये इतके आहे.
कटरा ते श्रीनगर ट्रेन वेळापत्रक
- पहिली वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन नं. 26401) सकाळी 8:10 वाजता कटरा येथून निघते आणि 11:08 वाजता श्रीनगरला पोहोचते.
- दुसरी ट्रेन (26403) दुपारी 2:55 वाजता सुटते आणि 5:53 वाजता श्रीनगरला पोहोचते.
- श्रीनगरहून पहिली ट्रेन (26404) सकाळी 8:00 वाजता निघते आणि 10:58 वाजता कटरा येथे पोहोचते.
- दुसरी ट्रेन (26402) दुपारी 2:00 वाजता सुटते आणि 4:58 वाजता कटरा येथे पोहोचते.
या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास सुमारे 2 तास 58 मिनिटांचा आहे. ट्रेन दरम्यान बनिहाल स्थानकावर थांबते.
पंतप्रधानांनी केलं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच जगातील सर्वात उंच सिंगल-आर्क रेल्वे पूल चेनाब ब्रिजचे उद्घाटन केले आहे. ‘सिंगल-आर्क ब्रिज’ म्हणजे दोन आधारांमध्ये एकच, सलग कमान असलेला पूल. या पुलामुळे प्रथमच काश्मीर खोऱ्याला देशाच्या मुख्य रेल्वे जाळ्याशी जोडण्यात आलं आहे. चेनाब नदीवर बांधलेला हा पूल एफिल टॉवरपेक्षा 35 मीटर (114 फूट) उंच आहे.





