Railway Ticket Booking Rules Changed : भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये मोठा बदल करत नवीन नियम जाहीर केले आहेत. हे नियम 12 जानेवारीपासून देशभर लागू होत असून, ऑनलाइन तिकीट मिळवण्याची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा अधिक कठोर आणि नियंत्रणात राहणार आहे. विशेषत: आधार कार्डाशी लिंक केलेले IRCTC खाते असलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे.
काय आहे नवा नियम (Railway Ticket Booking Rules Changed)
नव्या नियमांनुसार एआरपी म्हणजेच अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियडच्या पहिल्या दिवशी तिकीट बुक करण्याची परवानगी फक्त आधार-सत्यापित प्रवाशांनाच दिली जाणार आहे. यामुळे तिकीट कन्फर्म होण्याच्या शक्यता वाढणार असून, बुकिंगच्या सुरुवातीच्या क्षणी जागा मिळवण्यासाठी होणारी धावपळ काही प्रमाणात कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वेने ऑनलाइन बुकिंगची वेळ वाढवली असून, आता आधार-लिंक असलेले वापरकर्ते मध्यरात्रीपर्यंत तिकिटे बुक करू शकतील.
जर एखाद्या प्रवाशाने चार महिने आधीच्या प्रवासासाठी आज तिकीट बुक करायचे असेल, तर सत्यापित वापरकर्ता असल्यास पूर्ण दिवस आणि रात्र तिकीट बुक करण्यासाठी उपलब्ध असेल. अशा प्रकारे, सकाळी सर्व्हर स्लो असणे किंवा ठराविक वेळी मोठा ताण येणे यामुळे होणारा त्रास कमी होईल. अनेक प्रवाशांनी पूर्वी बुकिंग सुरू होताच काही सेकंदांत सर्व जागा संपल्याची तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ई-तिकीटिंग प्रणालीमध्ये काही दलाल आणि अनधिकृत घटकांकडून मोठ्या प्रमाणावर जागा ब्लॉक केल्या जात होत्या. याचा थेट फटका सामान्य प्रवाशांना बसत होता. खाते आधार कार्डाशी लिंक केल्याने अशा संशयास्पद व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. खरा प्रवासी तिकीट बुक करतोय की दलाल खात्यांचा गैरवापर करतोय, हे ओळखणे सोपे होणार आहे.,
फक्त ऑनलाइन बुकिंगसाठी नियम
दरम्यान रेल्वे स्थानकांवरून पीआरएस काउंटरवर प्रत्यक्ष जाऊन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतेही नियम बदललेले नाहीत. त्यांना बुकिंगची जुन्याप्रमाणेच परवानगी राहणार आहे. ही अट फक्त ऑनलाइन बुकिंगसाठ लागू आहे. म्हणजे IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अॅपद्वारे तिकीट घेणाऱ्यांवरच हा बदल परिणाम करणार आहे.
नियमांमधील बदल क्रमाक्रमाने केले गेले. सुरुवातीला बुकिंग उघडण्याच्या पहिल्या 15 मिनिटांसाठीच आधार पडताळणी आवश्यक होती. त्यानंतर 29 डिसेंबर 2025 पासून सकाळी 8 ते दुपारी 12 अशी वेळ वाढवण्यात आली. पुढे 5 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत बुकिंग करण्याची परवानगी देण्यात आली आणि आता 12 जानेवारीपासून आधार-सत्यापित वापरकर्त्यांसाठी तिकीट बुकिंग मध्यरात्रीपर्यंत पूर्ण दिवस उपलब्ध असेल.
या नव्या नियमामुळे वारंवार प्रवास करणारे किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मात्र ज्यांनी अजूनही आपले खाते आधारशी लिंक केले नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन तिकीट मिळवणे काहीसे कठीण होऊ शकते. रेल्वेच्या या निर्णयामुळे तिकीट बुकिंगमधील पारदर्शकता वाढेल आणि खऱ्या प्रवाशांना योग्य वेळी जागा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





