प्रयागराजमध्ये घोषणाबाजी आणि धक्काबुक्की; अविमुक्तेश्वरानंदांच्या शिबिरात जोरदार राडा

Written by:Smita Gangurde
Published:
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि स्थानिक प्रयागराज प्रशासन यांच्यातला सात दिवसांपासून सुरु असलेला वाद आता विकोपाला जाताना दिसत आहे.
प्रयागराजमध्ये घोषणाबाजी आणि धक्काबुक्की; अविमुक्तेश्वरानंदांच्या शिबिरात जोरदार राडा

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि स्थानिक प्रयागराज प्रशासन यांच्यातला सात दिवसांपासून सुरु असलेला वाद आता विकोपाला जाताना दिसतोय. शनिवारी यात काही हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनाही आता उतरल्यात. शनिवारी रात्री कट्टर सनातनी सेना या संघटनेचे १० ते १५ कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन आले आणि त्यांनी अविमुक्तेश्वरानंदांच्या शिबिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आय लव्ह बुलडोझर आणि मुख्यमंत्री योगी जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात येत होत्या.

शिष्य आणि आंदोलकांत धक्काबुक्की

अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रयागराजच्या अविमुक्तेश्वरानंदांच्या शिबिरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. हे कार्यकर्ते शिबिरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना अविमुक्तेश्वरानंदांच्या शिष्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यानंतर धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर शंकराचार्च अविमुक्तेश्वरानंदांच्या शिबिराला चारही बाजूने झाकण्यात आले असून आत जाण्याचा रस्ता बंद करण्यात आलाय.

शंकराचार्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार

या घटनेनंतर अविमुक्तेश्वरानंदांच्या शिष्यांनी पोलोस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. काही तरुण हे अचानक शिबिरात आले आणि त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी समजूत काढण्यात आली, मात्र परिस्थिती गंभीर होती, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. शंकराचार्य शिबिराच्या बाहेर बसतात. जर या उपद्रवी व्यक्तींनी पुन्हा हल्ला केला तर शंकराचार्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी तक्रारही करण्यात आली आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरांनदांना योग्य सुरक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

गेल्या सात दिवसांपासून वाद सुरु

मौनी अमावस्येला शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची पालखी प्रयागराज संगमावर जात असताना पोलिसांनी त्याला मज्जाव केला. हा शंकराचार्यांचा अपमान असल्याचं सांगत अविमुक्तेश्वरानंद यांनी धरणं आंदोलन सुरु केलं. प्रशासनानं माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती. हा वाद त्यानंतर सुरुच राहिला. प्रशासनानं माफी मागण्यास नकार देत अविमुक्तेश्वरानंद हे शंकराचार्य असल्याचं सिद्ध करावं, अशी नोटीस त्यांना बजावलीय. अविमुक्तेश्वरानंद यांच्या शंकराचार्याचा वाद कोर्टात आहे. मात्र तरीही अविमुक्तेश्वरानंद त्यांच्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर प्रशासनानं त्यांना दुसरी नोटीस देत माघ मेळ्यात त्यांना कायमची बंदी घालण्यात येईल असा इशाराही दिला. मात्र अविमुक्तेश्वरानंदांनी या नोटिशींना उत्तरही दिलं नाही, मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलेत.

Follow Us :GoogleNews