पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी, 3 जणं ठार, 50 जखमी, मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

Written by:Smita Gangurde
Published:
जगन्नाथाच्या नंदीघोष रथाच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली.
पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी, 3 जणं ठार, 50 जखमी, मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

भुवनेश्वर – ओडिशाच्या पुरीमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेनंतर रविवारीपहाटे 4 वाजता चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जणं जखमी झाले आहेत, त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.

ही दुर्घटना जगन्नाथ मंदिरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या गुडिचा मंदिर परिसरात घडली. जगन्नाथाच्या नंदीघोष रथाच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली.

मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

ओडिशाचे मुख्यमंत्री चरण माझी यांनी या घडलेल्या या प्रकरणानंतर माफी मागितली आहे. त्यांनी एक्स पोसस्ट करुन त्यांची दिलगिरी व्यक्त केलीय. ते म्हणाले की, मी आणि माझं सरकार जगन्नाथाच्या भक्तांची व्यक्तिगत रुपात माफी मागतो. झालेली बेपर्वाई माफ करण्याच्या लायकीची नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

या घटनेनंतर राज्य सरकारनं पुरीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बदली केली आहे. चंचल राणा यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाची तर पिनाक मिश्रा यांच्याकडे पोलीस अधीक्षकांची जबाबदारी देण्यात आलीय. यासह डीसीपी आणि काही पोलीस शिपायांचं निलंबनही करण्यात आलंय.

नेमका काय घडला प्रकार?

पुरीच्या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ त्यांच्या मावशीच्या घरी गुंडिचा मंदिरासमोर 9 दिवस उभे करण्यात येतात. या ठिकाणी सुभद्रा आणि बलभद्र यांचे रथ आधी पोहचले होते. भगवान जग्गनाथ यांचा रथ त्यानंतर दाखल झाला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु झाली.

याच काळात चेंगराचेंगरी झाली, धावपळ आली. यात काही जणं जमिनीवर पडल्यानंतर, त्यांना गर्दीनं तुडवलं. घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त नसल्याचं सांगण्यात येतंय. या दुर्घटनेत बसंती साहू, प्रेमकांती महंती आणि प्रभाती दास या तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आलेत.

शुक्रवारी शेकडो भाविकांची प्रकृती बिघडली

यापूर्वी 27 जून रोजी देवी सुभद्रेच्या रथाच्या आसपास गर्दी वाढल्यामुळं 625 पेक्षा जास्त भाविकांची तब्येत बिघडली होती. प्रशासनाच्या माहितीनुसार 70 पेक्षा जास्त जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील 9 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.

पुरीत शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरु झाली होती. पहिल्यांदा बलभद्राचा रथ ओढण्यात आला. त्यानंतर सुभद्रा आणि भगवान जगन्नाथाचा रथ ओढण्यात आला. ही रथयात्रा प्रचंड गर्दीमुळे रविवारी पहाटे पूर्ण झाली.