द्रासच्या भारतीय लष्करी तळावर ‘लेझर शो’साठी राज्य शासनाकडून 3 कोटींची मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडून मदतीचा धनादेश सैन्यदलाकडे सुपूर्द

Written by:Astha Sutar
Last Updated:
द्रास येथील लष्करी तळावर 'लेझर शो'च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा तीन कोटींचा धनादेश लष्कराचे कोअर लेफ्टनंट कमांडर हितेश भल्ला यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला. गतवर्षी मुख्यमंत्री असताना आपण कारगिलला आलो असता या लेझर शोसाठी निधी देण्याचे आपण मान्य केले होते. त्यानुसार आपण दिलेला शब्द पाळल्याचे शिंदेंनी सांगितले.
द्रासच्या भारतीय लष्करी तळावर ‘लेझर शो’साठी राज्य शासनाकडून 3 कोटींची मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडून मदतीचा धनादेश सैन्यदलाकडे सुपूर्द

State government : कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद संस्था तसेच आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘सरहद शौर्यथॉन-२०२५’ या स्पर्धेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. कारगिलमधील भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, यासाठी ‘लेझर शो’साठी महाराष्ट्र शासनाने ३ कोटींचा निधी एकनाथ शिंदेंनी आज भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

सैन्य दलांच्या बलिदानाला सलाम करण्यासाठी स्पर्धा

दरम्यान, विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपटू सहभागी झाले होते. कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. भारतीय सैन्यदलांचे शौर्य, धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील पहिली 21. 097 किमीच्या सर्वात आव्हानात्मक दौडीला म्हणजेच ‘ऑपरेशन विजय दौड’ असे नाव देण्यात आले होते. ही दौड कारगिल वॉर मेमोरियलपासून सुरू होऊन वळसा घालून पुन्हा तिथेच येऊन तिची सांगता करण्यात आली.

देशभक्तीची भावना निर्माण करणे

या स्पर्धेबद्दल बोलताना या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण करणे हाच उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सरहद संस्थेचे आभार मानले. तर १० किमी लांबीची दुसरी दौड ही ‘टोलोलिंग दौड’ म्हणून ओळखली गेली. तर तिसरी दौड ही ५ किमी लांबीची ‘टायगर हिल दौड’ म्हणून ओळखली गेली, तर चौथी आणि शेवटची म्हणजे 3 किमी लांबीची ‘फ्युचर हिरोज दौड’ या नावाने ओळखली गेली. या सर्व स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews