Tesla Car : आधीच आयात शुल्काचे लाखो रुपये, रंगासाठीही मोजावी लागतेय भली मोठी रक्कम

Written by:Smita Gangurde
Published:
Model Y साठी कंपनीने अनेक रंग उपलब्ध करून दिले आहेत. रंगानुसार कारच्या किमतीतही मोठा फरक पडतो.
Tesla Car : आधीच आयात शुल्काचे लाखो रुपये, रंगासाठीही मोजावी लागतेय भली मोठी रक्कम

एलन मस्क यांची इलेक्टिक कार कंपनी टेस्लाने अखेर भारतात पाऊल ठेवलं आहे. कंपनीने मुंबईत आपलं पहिलं अधिकृत शोरूम उघडलं आहे. टेस्लाने सद्यस्थितीत भारतात आपली मॉडेल Y ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ही एक ४-डोअर क्रॉसओव्हर एसयूव्ही आहे. जी दोन व्हेरियंटमध्ये मिळेल. या कारची एक्स-शोरूम किंमत ५९.८९ लाख ते ६७.८९ लाखांपर्यंत आहे. Model Y साठी कंपनीने अनेक रंग उपलब्ध करून दिले आहेत. रंगानुसार कारच्या किमतीतही मोठा फरक पडतो.

रंगानुसार कारची किंमत बदलते…

Tesla Model Y भारतात सहा वेगवेगळ्या रंगात लॉन्च करण्यात आली आहे. या रंगांची किमत वेगवेगळी आहे. स्टील्थ ग्रे हा स्टँडर्ड रंग मानला जात आहे आणि यासाठी वेगळे पैसे मोजावे लागणार नाही. मात्र जर ग्राहक पर्ल व्हाइट मल्टी कोट किंवा डायमंड ब्लॅकसारखे रंग निवडत असतील तर त्यांना ९५,००० रुपये अधिक द्यावे लागतील.

ग्लेशियर ब्लू रंगासाठी १.२५ रुपये अधिक द्यावे लागतील. तर क्विकसिल्वर आणि अल्ट्रा रेड सारख्या प्रिमियम रंगासाठी ग्राहकांना १.८५ लाख अधिक मोजावे लागतील. इंटीरियरबद्दल सांगायचं झालं तर टेस्ला ग्राहकांसाठी दोन पर्याय देते. या इंटीरियल पर्यायांसाठी कंपनी अधिक पैसे आकारत नाही.

भारतात टेस्लाची किंमत अधिक का आहे?

Tesla Model Y भारतात सीबीयूच्या रुपया आयात करण्यात आला आहे. याचा अर्थ ही कार पूर्णपणे परदेशात तयार होऊन भारतात आणली जाते. भारत सरकार सीबीयू (Completely Built Unit) कारसाठी तब्बल ७० टक्क्यांपर्यंत आयात कर लावते. या टॅक्समुळे एका कारमागे २१ लाख किंवा त्याहून अधिक पैसे मोजावे लागतात.

उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास, अमेरिकेत हीच कार $44,990 म्हणजेच साधारण ३८ लाखांपर्यंत जाते. मात्र भारतात याची किंमत ६० लाखांहून अधिक आहे. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे CBU टॅक्स, शांघाईहून होणारा ट्रान्सपोर्ट खर्च आणि कस्टम/हँडलिंगचा खर्च. या कारणांमुळे भारतात Tesla Model Y ची किंमत ग्लोबल मार्केटच्या तुलनेत खूप जास्त आहे. मात्र यात मिळणारे फीचर्स आणि तंत्रज्ञान ग्लोबल मॉडलसारखेच आहेत.