नवी दिल्ली- केंद्र सरकारनं आयपीएस अधिकारी पराग जैन यांना भारतीय गुप्तहेर संघटना असा परिचय असलेल्या रॉ संघटनेच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. सध्याचे रॉ चीफ रवी सिन्हा यांच्या जागी आता पराग जैन हे जबाबदारी सांभाळणार असून, रवी सिन्हा यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपतो आहे.
पराग जैन हे 1 जुलैला पदभार स्वीकारणार असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. सध्या त्यांच्याकडे एव्हिएशन रिसर्च हेड या पदाची जबाबदारी आहे. गेल्या 20 वर्षांपासून पराग जैन हे रॉमध्ये कार्यरत आहेत.
पराग जैन यांचा परिचय
पराग जैन यांचं कुटुंब उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आहे. 1989 सालचे पंजाब कॅडेरचे ते आयपीएस अधिकारी आहेत. तंत्रज्ञान आणि दहशतवाद विरोधी रणनीती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. यापूर्वी त्यांनी श्रीलंका आणि कॅनडामध्ये गुप्तहेरीच्या निरीक्षणाचं काम केलं असून त्यांच्याकडे याबाबतचा मोठा अनुभव आहे. ऑपरेशन सिंदूर, आर्टिकल 370 आणि बालाकोट एयस्ट्राईकच्या काळात त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे.
पराग जैन यांच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
1. एव्हिएशन रिसर्च सेंटरचे संचालक- रॉच्या अंतर्गत येणाऱ्या तांत्रिक गुप्तहेर केंद्राचं नेतृत्व ते करत होते. यात त्यांनी एयर सर्व्हिलन्स, सिग्नल अंटेलिजन्स, इमॅजरी इंटेलिजिन्स यासारख्या विभागांना अत्याधुनिक केलं. या कार्यकाळात एआरसीच्या गुप्त माहितीच्या विश्लेषणाला नवी उंची दिली.
2. ऑपरेशन सिंदूरचे सूत्रधार – मे 2025 मध्ये पीओके आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यांमध्ये पराग जैन यांची महत्त्वाची भूमिका होती. यासाठीची त्यांनी केलेली रणनीती निर्णायक ठरल्याचं मानण्यात येतंय. रॉच्या क्षमतेचं ही कारवाई म्हणजे प्रत्यक्ष उदाहरण होतं.
3. पंजाबमध्ये दहशतवाद विरोधी अभियानाचे हिरो- 1990 आणि 2000 च्या दशकात पराग जैन यांनी बठिंडा, मंसा, होशियारपूर अशा संवेदशनशील जिल्ह्यात पोलीस खात्यात मोठी जबाबदारी स्वीकारली. लुधियाना आणि चंदीगडमध्ये डीआयजी पदावर कार्यरत असताना दहशतवाद आणि ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
4. रॉमध्ये कार्यरत असताना त्यांनी पाकिस्तान विरोधातील डेस्कचं नेतृत्व केलं. बालाकोट एयरस्ट्राईक आणि कलम 370 हटवण्याच्या संवेदनशील क्षणात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
5. आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी- परदेशात भारतीय मिशनच्या दरम्यान श्रीलंका आणि कॅनडामध्ये कट्टरपंथीर खलिस्तानींच्या कारभारावर जवळून नजर ठेवली होती.





