पावसाळी वातावरणात टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय बाजारातील टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्याने हमखास दरवाढ होत असते. सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये तशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर भारतात आणि विशेषतः वायव्य राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला. यामुळे दिल्लीत टोमॅटोचे दर अचानक वाढले आणि सरासरी किरकोळ किंमत 73 रुपये प्रति किलोवर पोहोचली. काही दिवसांपासून हा दर 85 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. गेल्या आठवड्यापासून बाजारात टोमॅटोची उपलब्धता पुन्हा वाढू लागली आहे, ज्यामुळे किमती थोड्या कमी होऊ लागल्या आहेत.
दिल्लीत टोमॅटोच्या दरात वाढ!
दिल्लीत टोमॅटो महाग झाले असतील, परंतु चेन्नई आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये अजूनही किमती नियंत्रणात आहेत. चेन्नईमध्ये टोमॅटोचा सरासरी किरकोळ दर 50 रुपये प्रति किलो आहे तर मुंबईत तो 58 रुपये प्रति किलो आहे. दिल्ल्तील वाढत्या किंमती लक्षात घेता आता सरकारने किंमती नियंत्रणात आणण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वेगळीच योजना आखली आहे.
ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या दिल्लीतील जनतेसाठी सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) द्वारे दिल्लीत सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. आता राजधानीतील लोक स्वस्त दरात टोमॅटो खरेदी करू शकतील. ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सरकारचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्लीतील लोक आता 47 ते 60 रुपये प्रति किलो या दराने टोमॅटो खरेदी करु शकतील.
एनसीसीएफने 4 ऑगस्टपासून दिल्लीतील सर्वात मोठ्या भाजीपाला बाजारातून, आझादपूर मंडीतून टोमॅटोची खरेदी सुरू केली. त्यानंतर, हे टोमॅटो ग्राहकांना अगदी नाममात्र नफ्यात विकले जात आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या मते, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 27307 किलो टोमॅटो विकले गेले आहेत. हा निर्णय सरकारने ग्राहकांच्या हितासाठी घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि संघटनांकडून टीकेची झोड उठविण्यात आली आहे. सरकारी शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर त्यामध्ये आडकाठी घालत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना चांगला नफा अथवा पैसे मिळविण्याची संधी असताना आता सरकारकडून त्यामध्ये विरजन घातले जात असल्याची लोकांची भावना आहे. त्यामुळे यामध्ये सुवर्णमध्य सरकार कसा साधणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






