श्रीनगर – पहलगाम दहशतवादी हल्ल्लाला तीन महिने पूर्ण  झाले आहेत. या हल्ल्याचा सर्वाधिक फटका जम्मू आणि काश्मीरच्या  पर्यटनाला बसलाय. एप्रिल, मे, जून हे तीन महिने काश्मिरात पर्यटकांची रीघ लागत होती. पहलगाम हल्ल्यानंतर मात्र पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. हाऊस बोट, हॉटेल्स, टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अमरनाथ यात्रा सुरु झाल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र यात्रा सुरु झाल्यानंतरही पर्यटक काश्मिरात फिरकत नसल्याचं दिसतंय.

22 एप्रिलला पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेले तीन महिने याचा पर्यटनावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. सुरक्षेच्या कारणामुळे हल्ल्यानंतर काही काळ 87 पैकी 48 पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती. आता सर्व पर्यटनस्थळं खुली करण्यात आली असली तरी पर्यटकच काश्मीरात येत नसल्यानं, त्यावर अवलंबून असलेल्या रोजी-रोटीवाल्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे.

कर्ज घेऊन सुरु आहे गुजराण

काश्मिरात सातत्यानं येत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे अनेक स्थानिकांना रोजगार मिळत होता. त्यात टॅक्सी, हॉटेल, बोट, उंट, घोडेस्वार, कपड्यांचा बाजार यांचा  समावेश होता. काश्मिरी कलाकुसरीच्या कपड्यांचा व्यवसायही धोक्यात आला आहे. पर्यटकच नसल्यानं कर्ज काढून गुजराण करण्याची वेळ अनेकांवर आलेली आहे. काम ठप्प पडलेलं असताना मुलांचं शिक्षण, दररोजचा खर्चच भागवायचा  कसा असा प्रश्न अनेकांपुढे पडलेला आहे.

पर्यटनावर कसा झालाय परिणाम?

2024 साली काश्मिरात आलेल्या पर्यटकांची संख्या गेल्या 15 वर्षांतील सर्वोच्च संख्या होती. 29.5 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. त्यात 43 हजार परदेशी पर्यटकांचा  समावेश होता.

22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 80 टक्के बुकिंग रद्द करण्यात आली. ऑगस्टपर्यंत 13 लाख बुकिंग कॅन्सल करण्यात आल्याची माहिती आहे. पहलगाममध्ये 1500 हॉटेलांपैकी केवळ 10 टक्के हॉटेलांमध्ये  पर्यटक आहेत. काश्मिरात सर्वाधिक पर्यटन होत असलेल्या श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामची ही अशी अवस्था आहे.

श्रीनगरच्या डल लेकवरही शुकशुकाट

काश्मीर म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो श्रीनगरचा लाल चौक आणि श्रीनगरमधील डल लेक. दहशतवादी हल्ल्यानंतर नेहमी वर्दळ असलेल्याडल लेक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय. वीकेंडंला स्थानिक काश्मिरी येत असले तरी इतर राज्यांतून येत असलेल्या  पर्यटकांनी मात्र श्रीनगरकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक बोट हाऊस बंद आहेत. पर्यटक नसल्यानं सगळ्यांच्याच व्यवसायावर याचा गंभीर परिणाम झालेला आहे. अशा स्थितीत राज्य आणि केंद्र सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा इथले व्यवसायिक आता व्यक्त करु लागले आहेत.