ट्रम्प यांच्या ट्वीटने इराणच्या नागरिकांना भरली धडकी, राजधानी तेहरान सोडण्याचे आवाहन!

Written by:Rohit Shinde
Published:
इराण आणि इस्त्रायलमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरात हवाई हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ट्रम्प यांच्या ट्वीटने इराणच्या नागरिकांना भरली धडकी, राजधानी तेहरान सोडण्याचे आवाहन!

तेहरान: इस्रायलने इराणवर हवाई हल्ले करताना इराणमधील तेल डेपो, गॅस रिफायनरी प्रकल्प देखील लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता इस्रायलच्या तेस अवीव शहरावर इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायल चवताळला असून इस्रायल इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानच्या नागरिकांना चेतावणी दिली आहे.

तेहरान खाली करा -ट्रम्प

इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करा, असा इशारा नागरिकांना दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणची राजधानी असलेले तेहरान (Tehran) शहर खाली करण्याची गरज आहे. अणुकरारावर स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय मूर्खपणाचा आहे. इराणने या करारावर स्वाक्षरी केली पाहिजे होती. ही किती शरमेची बाब आहे आणि मानवी जीवांचा अपव्यय आहे. इराणकडे अणवस्त्रं असता कामा नयेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, ‘सगळ्यांनी तातडीने तेहरान खाली करा’, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

इस्रायलचे गाझावर भयावह हल्ले

गाझा मानवतावादी फाउंडेशनद्वारे अन्न केंद्रे चालवली जातात. हजारो पॅलेस्टिनी अनेवेळा या केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी इस्रायली लष्कराच्या नियंत्रणाखालील झोनमधून जातात. या घटनेला साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, “दक्षिणेतील सर्वात वर्दळीच्या मदत केंद्रांपैकी एक असलेल्या रफाह केंद्रावर गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी पहाटे इस्रायली सैन्याने गोळीबार केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर या घटनेबाबत इस्रायली सैन्याने काहीही भाष्य केलेले नाही.” त्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती आता पूर्णपणे बिघडताना दिसत आहे.