आधार कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक ओळखपत्र बनले आहे. सरकारी योजना, बँक खाते, शिष्यवृत्ती, गॅस सबसिडी, मोबाईल सिम व्हेरिफिकेशन अशा अनेक सेवांसाठी आधार अनिवार्य आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाची ओळख एकसंध आणि डिजिटल पद्धतीने सुरक्षित राहते. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळवण्यासाठीही आधार कार्ड उपयुक्त ठरते.
त्यामुळे आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र नसून पारदर्शक प्रशासन, डिजिटल भारत आणि सामाजिक समावेशनाचे प्रतीक बनले आहे. मात्र बऱ्याचदा आधार कार्डमधील चुकामुंळे किंवा त्या वेळीच अपडेट करता न आल्याने नागरिकांचे नुकसान होत असते. अशीच एक घटना चेन्नईत घडलीय, यावर मद्रास हायकोर्टाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
‘आधार अपडेट करणे मुलभूत अधिकार’
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. याबाबतच्या एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘आधार कार्ड अपडेट करणे हा मूलभूत आणि कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करताना लोकांना अडचणी येऊ नयेत याची काळजी UIDAI ने घ्यावी. कारण आधारकार्ड हे अनेक योजनांशी जोडलेले आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया सुलभ झाली पाहिजे.’ अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. त्यामुळे या मुद्द्याला राष्ट्रीय महत्व मिळाले आहे.
न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन यांच्या खंडपीठाने पुढे बोलताना म्हटले की, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे आणि त्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागणे चुकीचे आहे. असे मत न्यायमुर्तींना मांडले आहे.
मद्रास हायकोर्टाने असा निर्णय का दिला?
74 वर्षीय विधवा महिला पी. पुष्पम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे विधान केले आहे. पुष्पम यांच्या आधार कार्डवरील नावात आणि जन्मतारखेत चुका असल्याने त्यांची पेन्शन ब्लॉक करण्यात आली आहे, आता त्यांना आधार कार्ड दुरुस्त करण्यासाठी अडचणी येत आहेत. पुष्पम यांचे पती सैनिक होते, काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. आता त्यांनी पेन्शनसाठी अर्ज केला.
मात्र आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांना न्यायालयात धाव घेतली, त्यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. आता या प्रकरणात संबधित वृध्द महिलेला कसा न्याय मिळतो, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया काय?
आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. नागरिकांना त्यांच्या आधारमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक किंवा इतर माहिती बदलायची असल्यास दोन मार्ग आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन. ऑनलाइन अपडेटसाठी myAadhaar पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
ऑफलाइनसाठी जवळच्या आधार सेवा केंद्रात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून आणि आवश्यक पुरावे सादर करून बदल करता येतो. अपडेट केल्यानंतर नागरिकांना यूआयडीएआयकडून एसएमएसद्वारे पुष्टी मिळते. ही प्रक्रिया नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक माहितीत सुधारणा करून ती अद्ययावत ठेवण्याची संधी देते, जी त्यांच्या ओळखीच्या प्रामाणिकतेसाठी आवश्यक आहे.





