Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेच्या आधुनिकिकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा १७ जानेवारी रोजी गाठला जाणार आहे. देशातील पहिली वंदेभारत स्लीपर एक्सप्रेस आपल्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अत्याधुनिक ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात एकाच दिवशी सात नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही झेंडा दाखवला जाईल. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमधील लांब पल्ल्याच्या प्रवासाला नवा वेग आणि सोय मिळणार आहे.
मालदा येथून आयोजित होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत. वंदेभारत स्लीपर एक्सप्रेस हावडा ते गुवाहाटी (कामाख्या) या महत्त्वाच्या मार्गावर चालू होणार असून, पूर्व भारतातील प्रवास अधिक वेगवान आणि सुखद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कशी असेल वंदे भारत स्लीपर ( Vande Bharat Sleeper Train)
ही स्लीपर वंदे भारत ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असून, तिचे इंटिरीअर विमान प्रवासाची अनुभूती देईल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. केबिनमध्ये झोपेची मोकळी जागा, आरामदायी बेड, उत्तम प्रकाशयोजना, प्रायव्हसी शटर, आधुनिक प्रसाधनगृहे आणि सुरक्षा उपकरणे अशी सुविधा उपलब्ध असतील. या नवीन तंत्रज्ञानामुळे हावडा ते गुवाहाटी प्रवासात अंदाजे दोन तासांहून अधिक वेळ वाचणार असून, प्रवाशांना अधिक गतीमान प्रवासाचा अनुभव मिळेल.
पर्यटकांना फायदा होणार
वंदेभारत स्लीपर ट्रेनमुळे पूर्वोत्तर राज्यांमध्ये धार्मिक पर्यटन, वैद्यकीय प्रवास, व्यावसायिक दौरे आणि पर्यटन उद्योगाला नवीन उभारी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर बंगाल व आसाममधील प्रवाशांचा प्रवास वेगवान झाल्याने गुवाहाटी, कामाख्या, शिलाँग, तवांग आणि ईशान्येकडील इतर पर्यटनस्थळांना येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये चार महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजनही करणार आहेत. यात बालुरघाट-हिली नवीन रेल्वेमार्ग उभारणी, न्यू जलपायगुडी येथे मालवाहू गाड्यांसाठी अत्याधुनिक फ्रेट मेंटेनन्स सेंटर, सिलीगुडी लोको शेडचे उन्नतीकरण आणि जलपायगुडी जिल्ह्यातील वंदेभारत ट्रेनच्या मेंटेनन्स कारखान्याचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रदेशातील उद्योग, प्रवासी व्यवस्था आणि रोजगार निर्मितीला मोठा हातभार लागेल.
याच दिवशी देशात सात नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या देखील सुरु होणार आहेत. या गाड्या साध्या प्रवाशांसाठी अधिक स्वस्त, आरामदायी आणि आधुनिक सुविधा देणाऱ्या आहेत. नव्याने सुरू होत असलेल्या गाड्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
न्यू जलपायगुडी–नागरकोईल अमृत भारत एक्सप्रेस
न्यू जलपायगुडी–तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस
अलीपुरद्वार–एसएमवीटी बेंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस
अलीपुरद्वार–मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस
कोलकाता (हावडा)–आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस
कोलकाता (सियालदह)–बनारस अमृत भारत एक्सप्रेस
कोलकाता (संत्रागाछी)–तांबरम अमृत भारत एक्सप्रेस
या सर्व मार्गांवर नव्या ट्रेनमुळे उत्तर ते दक्षिण भारत अधिक सुलभरीत्या जोडले जाणार आहे. बंगाल, आसाम, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि मुंबई परिसरातील लाखो प्रवाशांना या गाड्यांमुळे अधिक जलद, आधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
१७ जानेवारी रोजीचे हे रेल्वे उद्घाटन केवळ एका नवीन ट्रेनचे लोकार्पण नसून, देशातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रगतीचे नवे प्रतीक ठरणार आहे. या कार्यक्रमानंतर अनेक राज्यांचा प्रवास नवा आकार घेईल आणि भारतातील रेल्वेचा वेग, गुणवत्ता आणि क्षमता आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.






