जेव्हा जागतिक मांसाच्या सेवनाबद्दल बोललं जातं, तेव्हा लोकांना असं वाटतं की सर्वाधिक प्रमाणात कोंबडीचं किंवा गोमांसाचं सेवन केलं जातं. पण तसं नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) मते, जगात सर्वाधिक खाल्लं जाणारं मांस म्हणजे डुकराचं मांस (पॉर्क) आहे. हे एकटं मांसच जागतिक मांस सेवनाच्या सुमारे 36% इतकं आहे.
सर्वाधिक डुकराचे मांस का खाल्ले जाते?
खरं तर आशियामध्ये डुक्कर पालन ही प्राचीन परंपरा आहे. हजारो वर्षांपासून लोक डुक्कर पाळत आले आहेत. डुक्कर पाळणं तुलनेने सोपं असतं आणि ते विविध हवामानांशी सहज जुळवून घेतात. त्याशिवाय, इतर प्राण्यांच्या तुलनेत डुक्कर जलद गतीने वाढतात आणि कमी खाद्यातून जास्त प्रमाणात मांस देतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ते अधिक फायदेशीर ठरतात.
संपूर्ण आकडेवारी काय सांगते?
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) आकडेवारीनुसार, जगातील एकूण मांस सेवनात डुकराच्या मांसाचा वाटा 36% आहे म्हणजेच तो सर्वाधिक आहे. त्यानंतर कोंबडीचं मांस 33%, गोमांस 24%, आणि मेंढी व शेळीचं मांस 5% इतकं आहे.
या क्रमवारीवरून स्पष्ट होतं की जागतिक मांस बाजारात डुकराच्या मांसाचं वर्चस्व किती प्रबळ आहे. विशेषतः चीनमध्ये जिथे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या राहते तिथेच डुकराच्या मांसाचं सर्वाधिक उत्पादन आणि सर्वाधिक सेवन दोन्हीही केलं जातं.
सांस्कृतिक आणि पाककलेचा प्रभाव
डुकराचं मांस केवळ एका प्रदेशापुरतं मर्यादित नाही ते अनेक देशांच्या पाक परंपरांमध्ये खोलवर रुजलेलं आहे. उदाहरणार्थ, चीनमध्ये “चा सिउ” (Char Siu) पासून ते ब्राझीलमधील “फेजोआदा” (Feijoada) पर्यंत, डुकराच्या मांसाचा वापर पारंपरिक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्या चवी आणि पोतामुळे हे मांस सॉसेज, रोस्ट, सूप, आणि स्नॅक्स अशा विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरलं जातं.
तथापि, इस्लाम आणि यहूदी धर्मात डुकराचं मांस खाण्यावर कडक बंदी आहे. त्यामुळे सौदी अरेबिया, इराण, आणि इस्रायलसारख्या देशांमध्ये त्याचं सेवन अत्यंत कमी प्रमाणात होतं.
भारतामध्येही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमुळे डुकराचं मांस आणि गोमांस या दोन्हींचं सेवन मर्यादित आहे. त्यामुळे इथे कोंबडीचं मांस (चिकन) सर्वाधिक प्रमाणात खाल्लं जातं.
डुकराचे मांस उत्पादन
डुकरांना कमी जागेची आवश्यकता असते. ते जलद पुनरुत्पादन करतात आणि खाद्याचे मांसात अधिक कार्यक्षमतेने रूपांतर करतात. डुकराचे मांस उत्पादन आर्थिकदृष्ट्या शाश्वत आहे आणि मर्यादित संसाधने असलेल्या देशांमध्ये ते अधिक सुलभ आहे.