जगातला सर्वात महागडा आंबा आता भारतात, किंमत 70 हजार रुपये प्रति किलो

Written by:Smita Gangurde
Published:
लाल रंगाचा आणि रसानं परिपूर्ण असलेल्या या आंब्याला एग ऑफ द सन या नावानंही ओळखलं जातं. तसचं हा आंबा खाल्ल्यानं कर्करोगावर मात करता येते
जगातला सर्वात महागडा आंबा आता भारतात, किंमत 70 हजार रुपये प्रति किलो

कुरुक्षेत्र – आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो हापूस. यंदाच्या मोसमात हापूसचा दर जास्त असल्याचं अनेकांनी ऐकलं आणि अनुभवलंही, दोन ते सहा , सात हजार रुपये डझनानं यावेळी हापूस विकला गेला. तरीही तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची चर्चा रंगली. मात्र सध्या देशात परदेशातून आलेल्या एका आंब्याची चर्चा आहे.

हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये सुरु असलेल्या फळ महोत्सवात जपानचा मियाझाकी आंबा सध्या चर्चेत आहे. हा आंबा जगातील सर्वात महागडा आंबा मानला जातो. भारतात या आंब्याची किंमत 50 हजार ते 70 हजार रुपये किलो इतकी आहे. तर जपान आणि दुबईसारख्या देशांत या आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये इतकी आहे.

कॅन्सर रोखणारा आंबा

लाल रंगाचा आणि रसानं परिपूर्ण असलेल्या या आंब्याला एग ऑफ द सन या नावानंही ओळखलं जातं. तसचं हा आंबा खाल्ल्यानं कर्करोगावर मात करता येते असा दावाही संशोधकांच्या वतीनं करण्यात आलाय. हा आंबा केवळ फळ नसून कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखणारं औषध असल्याचं काही संशोधकांचं म्हणणं आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही या आंब्याची मदत होते, असंही संशोधक सांगतायेत.

भारतातही होतोय तयार

या आंब्याचं वैशिष्ट्य आणि किमतीमुळे भारतात लाडवा येथे इंडो इस्रायल केंद्रात या आंब्याची लागवड करण्यात आली आहे. भविष्यातील फळ म्हणून या आंब्याकडे विशेष लक्ष देण्यात येतंय.

कसा असतो मियाझाकी आंबा?

जपानच्या मियाझाकी प्रांतात हा आंबा तयार होत असल्यानं त्याचचं नाव या आंब्याला देण्यात आलंय. या आंब्याचं झाड केवळ 4 फुटांचं असतं आणि त्याला फळ येण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. हा आंबा लाल रंगाचा असतो आणि एका आंब्यात वजन सुमारे 400 ग्रॅमच्या आसपास असतं. उत्तर प्रदेशातील रतौल या प्रसिद्ध आंब्यासारखीच चव या आंब्याला असते.

ऑस्ट्रेलिया, दुबईत मागणी

इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, दुबई या देशांत मियाझाकी आंब्याला विशेष मागणी आहे. आता या आंब्याची लागवड उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणातही करण्यात आलीय. विशेष म्हणजे आता हे आंबे भारतातून परदेशात आयातही करण्यात येतायेत.

 

Follow Us :GoogleNews