दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचा एआय व्हिडिओ तयार करणे काँग्रेसला भोवले आहे. या प्रकरणी दिल्लीत एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज दिवसभऱ खरंतर या व्हिडिओसंदर्भात सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत होती, त्यानंतर आता भाजपाकडून या संदर्भात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
काँग्रेसच्या आयटी सेलवर गुन्हा दाखल
भाजपचे दिल्ली निवडणूक सेलचे संकेत गुप्ता यांनी या प्रकरणी काँग्रेसच्या आयटी सेलवर एफआयआर नोंदविली आहे.दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. हा वादग्रस्त व्हिडिओ काँग्रेसच्या अधिकृत हँडलवर 10 सप्टेंबर 2025 रोजी प्रसारित केला होता. हा व्हिडिओ एआय जनरेटेड होता. त्यानंतर भाजपाशी संबंधित कार्यकर्ते आणि नेत्यांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती.
त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय दाखवलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्यासोबतच हा मातृत्व आणि महिलांच्या प्रतिष्ठेचाही अपमान असल्याची प्रतिक्रिया भाजपची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. पंतप्रधान आणि त्यांच्या आईविरुद्ध अश्लील टिप्पण्याही करण्यात आली होती.
हे प्रकरण गंभीर लक्षात घेऊन पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता एआय व्हिडिओप्रकरणी बीएनएसच्या विविध कलमांनुसार, आयटी अॅक्ट आणि डिजिटल डेटा प्रोटेक्शन अॅक्टच्या कलमांखाली गुन्हा दाखल झालाय. सध्या डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





