राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग वाद टिपेला, मतदार याद्यांबाबत आयोगाचं काय प्रत्युत्तर?

Written by:Smita Gangurde
Published:
आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीतील मतदार याद्यांत घोळ झाल्याचा आरोप आता करणं हे फक्त गोंधळ घडवण्यासाठी आहे, असं आयोगानं म्हटलंय.
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग वाद टिपेला, मतदार याद्यांबाबत आयोगाचं काय प्रत्युत्तर?

नवी दिल्ली – 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप सातत्यानं काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येतोय. काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर राजकीय पक्षही याच अजेंड्यावर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका करताना दिसतायेत. या आरोपांमुळे निवडणूक आयोगासारखी स्वायत्त संस्था वादात सापडली आहे. निवडणूक आयोगानं या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय. मत चोरीचे आरोप करणारे नेते आणि राजकीय पक्ष यांना आयोगानं कठोर इशारा दिलाय.

गेल्या निवडणुकांच्या मतदार याद्यांमध्ये असलेल्या गोंधळावरुन आता प्रश्न उपस्थित करणं अयोग्य असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया आणि आक्षेपासाठी योग्य वेळ सर्व राजकीय पक्षांकेडी त्यावेळी होता, असं आयोगानं स्पष्ट केलंय. सर्व राजकीय पक्ष त्या वेळी या प्रक्रियेत सहभागी होते असा दावाही आयोगाकडून करण्यात आलाय.

निवडणूक आयोगाचा काय दावा?

निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात आक्षेप घेणाऱ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना समज देण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकारत आयोगानं म्हटलंय की, मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांचा समावेश असतो. मात्र अनेक राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या बूथवरील कार्यकर्त्यांनी ड्राफ्ट केलेली यादी योग्यरित्या पाहिलेली नव्हती. आक्षेप घेण्यासाठी कालावधी दिलेला असतानाही, या राजकीय पक्षांकडून वा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही.

आयोगावर स्पष्टीकरणाची ही वेळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानं आलेली आहे. 7 ऑगस्टला राहुल गांधी यांनी 1 तास 11 मिनिटांचं सादरीकरण केलं होतं. त्यात 22 पानांमध्ये मतदार याद्यांतील घोळ्यांचं सादरीकरण त्यांनी केलं होतं. कर्नाटकात लोकसभा निवडणुकीत तर महाराष्ट्र, हरयाणात विधानसभा निवडणुकांत आयोगानं भाजपाच्या साथीनं मतदार याद्यांत फेरफार केल्याचा आरोप राहुल यांनी केला होता.

मतदार याद्यांत गोंधळ असेल तर वेळेत आक्षेप का नाही?

मतदार याद्यांत घोळ झाला, अशा त्रुटी असतील किंवा आरोप असेल तर आयोगानं आक्षेपासाठी दिलेल्या अवधीत प्रश्न का उपस्थित करण्यात आले नाहीत, असा सवाल आयोगानं केला आहे. ठरवलेल्या वेळेत आक्षेप घेण्यात आले असते तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच वेळी तपास करुन सुधारणा केल्या असत्या असंही आयोगाचं म्हणणं आहे.

आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीतील मतदार याद्यांत घोळ झाल्याचा आरोप आता करणं हे फक्त गोंधळ घडवण्यासाठी आहे, असं आयोगानं म्हटलंय. ज्यावेळी यासाठी कालावधी निर्धारित करुन देण्यात आला आला होता, त्यावेळी याबाबत हे राजकीय का बोलले नाहीत, असा प्रश्न आयोगानं उपस्थित केलाय. भविष्यात जर कुणाला याबाबत साशंकता असेल तर योग्य वेळी, ठरवून दिलेल्या कालावधीत आक्षेप उपस्थित करण्यात यायला हवेत, असंही आयोगानं सांगितलंय.