अफगाणिस्तानला हरवून भारत U19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये, आरोन जॉर्जचे शतक

Published:
311 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने फक्त 3 विकेट गमावत 41.1 षटकांत विजय मिळवला. आरोन जॉर्जच्या शतकासोबत वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून नूरिस्तानी उमरजईने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानला हरवून भारत U19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये, आरोन जॉर्जचे शतक

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अंडर-19 वर्ल्ड कप 2026 चा दुसरा उपांत्य सामना बुधवारी (04 फेब्रुवारी) हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत अंडर-19 वर्ल्ड कपचा दहावा अंतिम सामना खेळणार आहे. ‘मेन इन ब्लू’समोर 311 धावांचे आव्हान होते, जे त्यांनी 41.1 षटकांत सहज पूर्ण केले. या विजयात सलामीवीर आरोन जॉर्ज याने 104 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 115 धावांची शानदार खेळी करत मोलाची भूमिका बजावली.

हा अंडर-19 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग ठरला. यापूर्वी 2006 मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध 305 धावांचे लक्ष्य गाठले होते. भारताने हा विक्रम मोडत अंतिम फेरीत धडक मारली.

सामन्यात काय घडलं?

दुसऱ्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 4 गडी बाद 310 धावा केल्या. फैसल शिहनोजादा याने 93 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावांची दमदार खेळी केली, तर उजैरुल्लाहने 86 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा ठोकल्या. भारताकडून दीपेश देवेन्द्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

धावांचा पाठलाग करताना भारताचा दबदबा

311 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने फक्त 3 विकेट गमावत 41.1 षटकांत विजय मिळवला. आरोन जॉर्जच्या शतकासोबत वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून नूरिस्तानी उमरजईने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.

6 फेब्रुवारीला अंतिम सामना

आता स्पर्धेचा अंतिम सामना 06 फेब्रुवारी, शुक्रवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबवर होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होईल. या सामन्यात विजय मिळवत भारत सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.