MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

पंजाबला लोळवत आरसीबीची फायनलमध्ये धडक; बंगळुरू यंदा चषक जिंकणार?

Written by:Rohit Shinde
Published:
पंजाब किंग्सला 8 विकेट्सने लोळवत बंगळुरूच्या संघाने आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे, आता आरसीबी फायनल जिंकणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पंजाबला लोळवत आरसीबीची फायनलमध्ये धडक; बंगळुरू यंदा चषक जिंकणार?

चंदीगढच्या मुल्लानपुर स्टेडियमवर काल रात्री आयपीएलचा क्वालिफायर 1 सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर धमाकेदार मात करत आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आरसीबीचा हा पंजाब विरुद्धचा या मोसमातील दुसरा विजय ठरला. या महत्वपूर्ण सामन्यात पंजाब किंग्सने आरसीबीसमोर 102 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 2 विकेटच्या मोबदल्यात 10 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि पहिल्याच झटक्यात फायनलचं तिकीट मिळवलं. आरसीबीने 10 ओव्हरमध्ये 106 रन्स केल्या. यासह आरसीबीची ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची चौथी तर 2016 नंतरची पहिली वेळ ठरली. पंजाब किंग्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पंजाबला फायनल गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

आरसीबीची सांघिक कामगिरी; मोठा विजय

आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला पद्धतशीर 14.1 ओव्हरमध्ये 101 धावांवर गुंडाळलं. भुवनेश्वर कुमार, दयाल, कृणाल पांड्या, जॉश हेझलवूड यांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे 102 धावांचं माफक आव्हान बंगळुरूला मिळालं. गोलंदाजांनंतर आरसीबीच्या फलंदाजांनी धमाका करत 60 बॉल राखून आव्हान पूर्ण केलं. आरसीबीच्या 4 फलंदाजांनी विजयात योगदान दिलं. आरसीबीसाठी फिल सॉल्ट याने सर्वाधिक योगदान दिलं. तर विराट कोहली,मयंक अग्रवाल आणि कर्णधार रजत पाटीदार या तिघांनीही धावा जोडल्या. त्यामुळे आरसीबीने हा सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळवलेला विजय आहे, यंदा आरसीबीचा संघ फायनलमधील विजयाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे.

पंजाबला मिळणार आणखी एक संधी

आयपीएलचा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये आज खेळला जात आहे. या सामन्यातील विजेत्या संघासोबत क्वालिफायर 2 सामना खेळण्याची संधी पंजाब किंग्सला मिळणार आहे. या सामन्यात विजय मिळवत फायनल गाठण्याची संधी पंजाबच्या संघाला मिळणार आहे, ही पंजाबसाठी दुसरी संधी असणार आहे.

मुंबई वि. गुजरात एलिमिनेटर कोण जिंकेल?

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स भिडणार आहेत. हा सामना शुक्रवारी 30 मे ला होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पंजाब विरुद्ध भिडेल. तर पराभूत होणाऱ्या संघांचा आव्हान संपुष्ठात येईल. त्यामुळे गुजरात आणि मुंबई दोन्ही संघांसाठी ही आरपार अर्थात करो या मरो अशी लढाई असणार आहे.