Marathi News

२०२५ मध्ये नागपंचमी कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजेची योग्य पद्धत जाणून घ्या…

Published:
हिंदू धर्मात नाग पंचमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. नाग पंचमीच्या दिवशी सर्प देवतेची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. सर्प देवतेच्या पूजेमुळे भोलेनाथ प्रसन्न होतात.
२०२५ मध्ये नागपंचमी कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजेची योग्य पद्धत जाणून घ्या…

श्रावण महिना सुरू होताच भारतामध्ये अनेक सण साजरे केले जातात. श्रावण महिन्यामध्ये अनेक धार्मिक पूजा आणि सण साजरे केले जातात. नाग पंचमी हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. नाग पंचमी हा श्रावण महिन्यातील प्रमुख सणांपैकी एक आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागदेवतेची पूजा केली जाते. यंदा नागपंचमी कधी आहे, जाणून घ्या महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत…

नाग पंचमी कधी आहे?

यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 29 जुलै रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी सुरू होईल आणि 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजून 46 मिनिटांपर्यंत राहील. उदयतिथीनुसार, यावर्षी नागपंचमी मंगळवार, 29 जुलै 2025 रोजी साजरी केली जाईल. नाग पंचमीची पूजा करण्याचा सर्वोत्तम वेळ 29 जुलै रोजी सकाळी 05 वाजून 41 मिनिटांनी सुरू होईल ते 08 वाजून 23 मिनिटांपर्यंत असेल.

पूजेची योग्य पद्धत

नागपंचमीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी, ‘मी आज नागपंचमीचे व्रत करत आहे’ असा संकल्प करावा. घर स्वच्छ करून, रांगोळी काढावी. मातीच्या किंवा धातूच्या नागाची मूर्ती/चित्र घराच्या मुख्य ठिकाणी ठेवावे. नागाला दूध, लाह्या, फुले, धूप, नैवेद्य अर्पण करावे. नागपंचमीची कथा ऐकावी किंवा वाचावी. नागदेवतेला नैवेद्य दाखवावा. नागाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. नागपंचमीला उकडून केलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे, कारण या दिवशी तवा किंवा सुरी/चाकूचा वापर टाळला जातो. या दिवशी काही विशिष्ट गोष्टी करणे टाळले जाते.

नाग पंचमी 2025 चे महत्त्व

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील 5 व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे, कारण त्यांना देवाचा दर्जा दिला जातो आणि ते भगवान शंकराच्या गळ्यात हार म्हणून शोभतात. या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. नागपंचमीला नागांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी नागांना दूध पाजले जाते आणि त्यांची आरती केली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो, त्यांच्यासाठी नागपंचमीला पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. यामुळे कालसर्प दोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews