श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पुराणात सांगितले आहे की समुद्रमंथनावेळी निर्माण झालेल्या हलाहल विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शंकराने ते पिऊन संहार टाळला. त्यामुळे त्यांच्या कंठाला निळा रंग आला आणि ते नीलकंठ महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले. या घटनेनंतर देवतांनी त्यांच्यावर गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करून त्यांना शांती दिली. म्हणूनच श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बेलपत्र, धतूरा अर्पण करण्याची परंपरा आहे. आपल्यावर भगवान शंकराची कृपा रहावी यासाठी श्रावणात महिला वर्गाकडून पूजा केली जाते.
भगवान शंकर श्रावणात का पूजनीय?
या महिन्यात भक्त श्रावण सोमवारचे व्रत करतात. स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर पुरुष मानसिक शांतता व यशासाठी उपवास करतात. भक्त “ॐ नमः शिवाय” किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. काही भक्त रुद्राभिषेक, शिवपंचाक्षरी स्तोत्र, किंवा शिवतांडव स्तोत्र म्हणतात. अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये विशेष पूजन, कीर्तन, अभिषेक यांचे आयोजन केले जाते. काहीजण गंगाजल आणून शिवलिंगावर अर्पण करतात. या काळात भक्तीभाव, संयम, आणि मनाची शुद्धता या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की श्रावण महिन्यात भगवान शंकराची भक्ती केल्यास सर्व दुःख दूर होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. त्यामुळे हा महिना भक्तांसाठी अत्यंत पूजनीय मानला जातो.
हे ही वाचा
‘या’ 108 नावांचा उच्चार नक्की करा
भगवान शंकरांची मनोभावे पूजा करण्याचे फायदे
भगवान शंकरांची मनोभावे पूजा केल्याने मानसिक शांती, आरोग्य, आणि जीवनात स्थैर्य प्राप्त होते. त्यांच्या कृपेने संकटे दूर होतात, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. श्रद्धेने केलेली पूजा कर्मातील अडथळे दूर करते व आयुष्यात यश, धन आणि समाधान प्राप्त होते. शंकराचे स्मरण मनाला शुद्ध करते आणि आत्मिक उन्नतीस मदत करते. विशेषतः श्रावण महिन्यात मनोभावे पूजा केल्यास ती अधिक फलदायी मानली जाते. नियमित शिवपूजा केल्यास दीर्घायुष्य, सौभाग्य आणि कुटुंबातील सुख-संपत्ती वाढते. त्यामुळे भगवान शंकराची भक्ती ही आध्यात्मिक व व्यवहारिक दृष्टिकोनातून लाभदायक ठरते.