Mahashivratri 2026 : महाशिवरात्री का साजरी केली जाते? जाणून घ्या या दिवसाचे अध्यात्मिक महत्त्व

Published:
हिंदू दिनदर्शिकेनुसार, या वर्षी महाशिवरात्री व्रत 15 फेब्रुवारी 2026 रोजी केले जाईल. महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा पवित्र सण आहे.
Mahashivratri 2026 : महाशिवरात्री का साजरी केली जाते? जाणून घ्या या दिवसाचे अध्यात्मिक महत्त्व

दरवर्षी आपण न चुकता महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करतो. या दिवशी अनेक लोक उपवास देखील ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का महाशिवरात्री का साजरी केली जाते? नेमकं काय कारण आहे? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

का साजरी केली जाते महाशिवरात्री?

महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवाचा सर्वात प्रमुख सण आहे, जो अंधार व अज्ञानावर मात करण्याचे, अध्यात्मिक जागृतीचे आणि शिवाच्या पूजेद्वारे आत्मशुद्धीचे प्रतीक आहे. पुराणांनुसार, महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला होता. यामुळे या रात्री जागरण करून शिव-पार्वतीची पूजा केली जाते.  या रात्री शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी ‘तांडव नृत्य’ केले होते, असे मानले जाते. या रात्री भगवान शिव पहिल्यांदा शिवलिंग रूपात (निराकार ते साकार) पृथ्वीवर प्रकट झाले होते, ज्याची पूजा प्रथम ब्रह्मदेव आणि विष्णूने केली होती. समुद्र मंथनातून निघालेले ‘हलाहल’ विष प्राशन करून भगवान शिवाने जगाला विनाशापासून वाचवले. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

शिवलिंग म्हणजे काय?

शिवलिंग हे शंकराच्या निराकार आणि अनादी रूपाचे प्रतीक आहे. हे अवकाशात फिरणाऱ्या ब्रह्मांडाचा एक अंश मानले जाते.  ‘लिंग’ या शब्दाचा अर्थ ‘चिन्ह’ किंवा ‘प्रतीक’ असा होतो. शिवलिंग म्हणजे ज्यातून सर्व सृष्टी निर्माण झाली आहे आणि ज्यात ती विलीन होते, असे शिवतत्व. शिवलिंगाचे तीन भाग मानले जातात: खालचा भाग (ब्रह्म), मधला भाग (विष्णू) आणि वरचा गोलाकार भाग (शिव).

कधी आहे महाशिवरात्री?

यावर्षी रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा पवित्र सण आहे. या दिवशी भक्त उपवास आणि ध्यान करतात, ज्यामुळे मन शांत होते आणि आत्मिक शांती प्राप्त होते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)