हिंदू धर्मात देवाची पूजा करताना फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ताजी आणि सुगंधी फुले अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.. मात्र, अनेकदा आपण श्रद्धेपोटी देवाला फुले अर्पण करतो, पण ती किती काळ देव्हाऱ्यात ठेवावीत किंवा ती कधी विसर्जित करावीत, याकडे दुर्लक्ष करतो. वास्तुशास्त्रानुसार, देवाला वाहिलेली फुले ठराविक वेळेत न काढल्यास घरात नकारात्मकता पसरू शकते. त्यामुळे घराची भरभराट आणि सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी निर्माल्याचे विसर्जन नक्की कधी करावे? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
फुलं विसर्जित करण्याची योग्य वेळ कोणती?
देवाला वाहिलेली फुले सकाळी पूजा झाल्यानंतर लगेच नाही, तर सूर्यास्तापूर्वी (दिवस मावळण्यापूर्वी) काढून घेणे आवश्यक आहे. वाळलेली फुले देव्हाऱ्यात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार सुकलेली फुले ‘शवा’समान मानली जातात आणि ती अधिक काळ देव्हाऱ्यात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव
वाळलेली किंवा कोमेजलेली फुले नकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत बनतात. यामुळे घरात मानसिक तणाव, चिडचिडेपणा आणि वादविवाद वाढू शकतात. जेव्हा फुले कोमेजतात, तेव्हा त्यातील जिवंतपणा आणि सात्त्विकता संपून ती निर्जीव होतात, ज्याचा थेट परिणाम घराच्या वातावरणावर होतो. शास्त्रात वाळलेल्या फुलांना ‘शवा’समान मानले गेले आहे. जर ही फुले वेळेवर काढली नाहीत, तर नकारात्मक शक्तींचा वावर वाढण्याची शक्यता असते.
मानसिक परिणाम
कोमेजलेली फुले पाहिल्याने मनावर मरगळ येते, ज्यामुळे घरातील व्यक्तींमध्ये चिडचिडेपणा आणि मानसिक तणाव वाढू शकतो. अशी फुले घरात ठेवल्याने प्रगतीत अडथळे येतात.
वास्तुदोष
देव्हाऱ्यात वाळलेली फुले तशीच ठेवणे हा एक प्रकारचा वास्तुदोष मानला जातो. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि कौटुंबिक वादविवाद वाढण्याची शक्यता असते.
विसर्जनाची योग्य पद्धत
- जुनी फुले (निर्माल्य) वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत. फुले वाहत्या नदीत किंवा नैसर्गिक जलाशयात विसर्जित करावीत. नदी उपलब्ध नसल्यास, घरी एका बादलीत पाणी घेऊन त्यात फुले टाकावीत आणि ते पाणी झाडांना द्यावे.
- घरातील बागेत किंवा कुंडीत छोटा खड्डा खणून त्यात ही फुले गाडावीत. यामुळे काही दिवसांनी फुलांचे नैसर्गिकरीत्या खत तयार होते, जे पर्यावरणासाठी पूरक ठरते.
- सुकलेल्या फुलांपासून घरी धूप किंवा अगरबत्ती तयार करता येते. यामुळे निर्माल्याचा अपमानही होत नाही आणि घरात सुवास दरवळतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





